सुटकेविरोधात दिल्ली पोलीस उच्च न्यायालयात : 7 फेब्रुवारीला होणार सुनावणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस खासदार शशी थरूर यांना त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी क्लीनचिट मिळाली आहे. त्याविरोधात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पतियाळा हाऊस न्यायालयाने गेल्यावषी ऑगस्टमध्ये थरूर यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने थरूर यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 7 फेब्रुवारी 2023 ही तारीख निश्चित केली आहे.
जुलै 2014 मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्करचा मृतदेह सापडला होता. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर पत्नी सुनंदा पुष्कर हिचा मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. प्रदीर्घ तपासानंतर दिल्ली पोलिसांनी पती शशी थरूर यांच्याविरुद्ध भादंवि 498-ए (पती किंवा नातेवाईक महिलेवर अत्याचार करणे) आणि 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले होते. या निकालानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले होते. गेल्या 7 वर्षांपासून मी वेदना आणि यातना सहन करत असल्याचे त्यांनी आपल्या मुक्ततेनंतर स्पष्ट केले होते. मात्र, आता पुन्हा दिल्ली पोलिसांनी न्यायालयात धाव घेतल्याने शशी थरूर यांच्यामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लागू शकतो.