पूनर्वसन केंद्र सज्ज ठेवण्यासह पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचा उपायुक्तांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
आठवडय़ापासून पावसाचा जोर वाढल्याने काही ठिकाणी जीर्ण झालेल्या घरांची पडझड सुरू आहे. नालाकाठांवरील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची माहिती घेण्याबरोबरच पूरपरिस्थिती निर्माण होणाऱया परिसराची पाहणी करून दररोज कार्यालयात अहवाल द्या, असा आदेश सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी बजावला. तसेच नेहमी अलर्ट राहण्याची सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱयांना केली.
पावसाचा जोर वाढल्याने विविध परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक महसूल उपायुक्तांनी मंगळवारी घेतली. यावेळी विविध सूचना केल्या. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याने जलाशयातील अतिरिक्त पाणी नद्यांना सोडण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. तसेच शहरातील नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने नालाकाठावरील वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते, महसूल विभागातील महसूल निरीक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांनी 24 तास सतर्क रहावे, अशा सूचना सामान्य प्रशासन उपायुक्तांनी मंगळवारी मनपाच्या अधिकाऱयांना केल्या. पूनर्वसन केंद्रे स्थापन करण्याच्यादृष्टीने मंगल कार्यालये, समाज मंदिर आदी ठिकाणी पाहणी करून स्वच्छ करण्याची सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱयांना केली. सध्या कोणत्याही कार्यक्रमाची बुकिंग करू नये, अशा सूचना करण्याचा आदेश बजावला. त्याचप्रमाणे पावसामुळे शहरात घरांची पडझड झाली आहे. त्या सर्व घरांची पाहणी करून अहवाल सादर करावा, पूरपरिस्थिती निर्माण होणाऱया परिसराची पाहणी करून दररोज सायंकाळी कार्यालयीन वेळेत माहिती सादर करण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांना सामान्य प्रशासन उपायुक्तांनी केली.