गोवा खंडपीठाने याचिकेची घेतली दखल : दोन आठवड्यात उत्तर देण्याची सूचना
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस नेते आणि माजी गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या 8 फुटीर काँग्रेस आमदार विरोधातील याचिकेची गोवा खंडपीठाने दखल घेतली असून सभापतींसह सर्व फुटीरांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 2 आठड्यात त्यांनी उत्तर सादर करावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे सभापतींकडे सादर करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे 8 आमदार फुटून भाजपवासी झाल्यानंतर त्यांच्या विरोधात चोडणकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली होती. त्याबाबत सभापती काहीच हालचाली करीत नसल्याने चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि सभापतींना मर्यादित काळात म्हणजे 90 दिवसात निकाल देण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी करणारी याचिका सादर केली. तिच्यावर सुनावणी करण्यास गोवा खंडपीठाने नकार दर्शवला, कारण तेथील एक न्यायाधीश पूर्वी गोवा खंडपीठात वकिली करीत होते व त्यांनी काही काँग्रेस आमदारांचे फुटण्यापूर्वी वकील म्हणून काम केले होते.
विशेष खंडपीठात झाली सुनावणी
त्यानंतर सदर याचिका विशेष खंडपीठाकडे सोपवण्यात आली आणि तिच्यावर सुनावणी झाली. सभापतींकडे आलेल्या अपात्रता याचिकांचा निकाल 90 दिवसात लावला पाहिजे असा निवाडा यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचा संदर्भ घेऊन सभापतीनी 90 दिवसात निकाल द्यावा व तसे निर्देश खंडपीठाने त्यांना द्यावेत अशी याचना चोडणकर यांनी केली आहे.
दोन आठवड्यांनतंर पुन्हा सुनावणी
दोन आठवड्यानंतर सदर याचिका पुन्हा सुनावणीस येणार असून फुटीरांच्या उत्तरावरच आमदारांचे भवितव्य ठरणार आहे.
आठ आमदारांचे पक्षांतर
एक वर्षापूर्वी म्हणजे मागील फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभा निवडणूक निकाल होऊन काँग्रेस पक्षाचे एकूण 11 आमदार निवडून आले होते. त्यातील 8 आमदारांनी सप्टेंबर 2022 मध्ये पक्षांतर केले आणि ते भाजपवासी झाले. त्यात मायकल लोबो, डिलायला लोबो, दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर आणि रुडाल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता. त्या फुटीर 8 आमदारांना अपात्र ठरवावे, अशी याचिका गिरीश चोडणकर यांनी सभापती रमेश तावडकर यांच्याकडे सादर केली होती. नंतर तशीच याचिका त्यांनी गोवा खंडपीठात सादर करून दाद मागितली आहे. यापूर्वी काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये गेले होते, त्यांना अपात्र ठरवणारी याचिका अजूनही सभापती कार्यालयात धुळखात पडून आहे, आणि त्यावर निकाल झालेला नाही.