पुणे : कोथरुड पोलीस ठाणे अभिलेखावरील कुविख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळ (वय ३८ वर्षे, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे) याने साथीदारांसह पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामीणमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घातक व जीवघेण्या हत्यारांसह खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. या भागात त्याची दहशत असल्यामुळे भितीपोटी कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. मात्र, पुणे पोलिसांनी पुढाकार घेत गँगस्टर शरद मोहोळ याला तडीपार केले आहे.
गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर दाखल असलेल्या दत्तवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब). २०१ आर्म्स ॲक्ट क.३.४.२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ या गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी झाल्याने न्यायालयाने आरोपी शरद मोहोळ यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर शिक्षेविरुद्ध आरोपीने अपील केलेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केल्याने त्याला सन २०२१ मध्ये कारागृहातून मुक्त करण्यात आले होते. कारागृहातुन मुक्त होताच थोड्याच दिवसात त्याच्यावर पुन्हा खडक व हिंजवडी पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. यावरुन गुन्हेगाराच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले व त्याची गुन्हे करण्याची सवय मोडीत निघाली नाही. त्यामुळे गुन्हेगार शरद मोहोळ याची समाजातील भिती व हिंसा कमी करुन त्याच्या बेकायदेशीर कृत्यांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे असल्याने तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीचे कालावधीत त्याच्याकडून एखादा गंभीर व दखलपात्र गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जनहितासाठी त्यास पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१चे कलम ५७ (१) (अ) (१) मधील तरतुदींनुसार नमुद गुन्हेगार शरद मोहोळ यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी मंजूर केला आहे.