ऑस्ट्रेलिया ओपन : स्वायटेकचा सलामीचा सामना निमेरशी
वृत्तसंस्था /मेलबोर्न
सोमवार दि. 16 जानेवारीपासून येथे सुरू होणाऱया 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ गुरुवारी येथे काढण्यात आला. या ड्रॉनुसार सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविचचा सलामीचा सामना रॉबर्टो बायेनाशी तर महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेकचा पहिल्या फेरीतील सामना ज्युली निमेरशी होणार आहे.
सर्बियाच्या जोकोविचने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा 9 वेळा जिंकली असून आता तो विक्रमी दहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पेनचा माजी टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता राफेल नदाल याचा सलामीचा सामना ब्रिटनच्या जॅक ड्रेपरशी होणार आहे. नदालला 2022 चा टेनिस हंगाम फारसा लाभदायक ठरला नाही. या कालावधीत त्याला वारंवार दुखापती समस्येने चांगलेच दमवले होते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्पेनच्या नदालने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. रशियाच्या मेदव्हेदेवचा पहिल्या फेरीतील सामना मार्कोस गिरॉनशी होणार आहे. नॉर्वेचा द्वितीय मानांकित कास्पर रुडने गेल्या वर्षीच्या टेनिस हंगामात दोनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवले होते. त्याचा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलामीचा सामना टॉमस मॅचेकशी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सुरू असलेल्या सरावाच्या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस आणि सर्बियाचा जोकोविच यांच्यात लढत होणार असून या टेनिसपटूंचा सामना पाहण्यासाठी केवळ 58 मिनिटात तिकीटे विकली गेली. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरेचा सलामीचा सामना इटलीच्या बेरेटेनीशी तर रशियाच्या रुबलेवचा सलामीचा सामना वाईल्ड कार्डधारक ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमशी होणार आहे.
महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक हिचा सलामीचा सामना जर्मनीच्या ज्युली निमेरशी होणार आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची माजी टॉप सिडेड ऍस्ले बार्टीने दुखापतीमुळे निवृत्त झाल्याने पोलंडच्या स्वायटेकने विजय मिळवला. या स्पर्धेत स्वायटेकने आपली विजयी घोडदौड कायम राखल्यास तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कदाचित अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको गॉफशी तसेच तृतीय मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाशी होण्याची शक्यता आहे. द्वितीय मानांकित जेबॉरचा सलामीचा सामना झिडानसेकशी होणार आहे. टय़ुनिशीयाच्या जेबॉरने गेल्या वर्षी अमेरिकन आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेतील माजी विजेत्या सोफिया किनेन आणि व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.