वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी कोरोनासंबंधी सक्तीचे निर्बंध हटविण्यात आले असून आता कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूला खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. आयसीसी व ऑस्ट्रेलियन सरकारने या स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंना कोणतेही निर्बंध पाळावे लागणार नाहीत तसेच त्यांची नियमितपणे चाचणीही घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत कोव्हिड 19 साठी सक्तीचे नियम हटविण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे याच देशात गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सुपरस्टार टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचला कोरोना लस घेतली नसल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला होता. त्यामुळे त्याला ती स्पर्धा हुकली होती. ‘एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि खेळण्याइतपत तो योग्य असल्यास तो सामन्यात सहभागी होऊ शकतो. मात्र त्याआधी मेडिकल टीमचा सल्ला घेतला जाईल. मास्क घालणे व सोशल डिस्टन्स ठेवणे हे बायो सिक्युरिटीची नियम मात्र त्या बाधित खेळाडूला पाळावे लागतील,’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.