पुणे / प्रतिनिधी :
कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहेत. हे काम कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Dr Suresh Khade) यांनी दिले.
साखर संकुल येथे आयोजित कामगार विभागाच्या पुणे विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक एम. आर. पाटील, अपर संचालक अ. धो. खोत उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, कामगार भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडणे आवश्यक असून, जागा निवडताना कामगारांची सोय पहावी. या इमारतीत जिल्हा कार्यालये व विभागीय कार्यालये अशी स्वतंत्र व्यवस्था असावी. शक्यतो एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भूमीपूजन या वर्षातच होईल, असे नियोजन सर्व अधिकाऱयांनी करा, असे डॉ. खाडे यावेळी म्हणाले.
अधिक वाचा : उद्योग केंद्रीत अभ्यासक्रमांची निर्मिती करा, UGC चे निर्देश
डॉ. खाडे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पुणे विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयांची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा वैयक्तीक प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावा. साखर कारखान्यातील कामगारांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. काही कारखाने बंद पडल्यामुळे कामगारांच्या देय रकमांबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. एमआयडीसी तसेच औद्योगिक क्षेत्राबाहेरीलही सर्व कंपन्या नोंदणीकृत असल्याबाबत खात्री करावी. नोंदणी न झालेल्या कारखान्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कामगारांच्या नोंदणीसाठी मोहिमेस्तरावर काम करावे. एकही कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.