Tarun Bharat

आता म्हादईसाठी ‘जनमत कौल’ घेण्यात यावा

’सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ ची गोमंतकीयांना हाक, 16 रोजी ‘चलो सांखळी’

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याच्या महाराष्ट्रात विलिनीकरणासाठी घेण्यात आलेल्या जनमत कौलाच्या धर्तीवर आता म्हादईच्या बचावासाठी पुन्हा एकदा जनमत कौल घेण्यात यावे, असे संयुक्त आवाहन ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या बॅनरखाली एकत्र आलेल्या विविध बिगर सरकारी संघटना (एनजीओ) आणि विरोधी पक्षांनी केले आहे.

याचाच भाग म्हणून येत्या दि. 16 रोजी दुपारी 4 वाजता ‘चलो सांखळी’चेही आवाहन करण्यात आले आहे. 16 जानेवारी हा दिवस ‘ओपिनियन पोल डे’ म्हणून पाळण्यात येतो. त्यामुळे दि. 16 पर्यंत म्हादईचे संरक्षण करण्याची आमची मागणी केंद्राने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा केंद्राच्या निषेधाचा भाग म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही यावेळी देण्यात आले.

बैठकीत बोलताना ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी, म्हादईचे रक्षण आणि संवर्धनासाठी गोव्यातील लोकांनी राजकीय संबंध बाजूला ठेवून संघटित व्हावे, असे आवाहन केले. म्हादईच्या रक्षणासाठी गोवा सरकार केंद्राविरुद्ध लढा उभारत असेल तर आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे जाहीर करण्यात आले. तरीही 16 जानेवारीपर्यंत मंजुरी मागे घेण्यास केंद्राला भाग पाडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यास मात्र आम्हाला दुसऱयांदा जनमत कौल घेण्याची मागणी करावी लागेल, तसेच शिरोडकर म्हणाले. त्याचबरोबर केंद्र आणि कर्नाटकच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारीही शिरोडकर यांनी दिला.

 कार्यकर्त्या तारा केरकर यांनी बोलताना, म्हादईबाबत एवढा निर्ढावलेपणा दाखविण्यास कर्नाटकाला बळ मिळण्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य भाजप नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच या मुद्दय़ावर आता ते ‘मगरीचे अश्रू’ ढाळत असल्याची टीका केली. या नेत्यांना म्हादईची एवढीच काळजी असती या अपयशाची जबाबदारी स्वीकारत एव्हाना त्यांनी राजीनामे दिले असते, असेही केरकर म्हणाल्या.

म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे आणि तिचे पाणी वळवल्यास वन्यजीव, पर्यावरण आणि मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी म्हादईवर अवलंबून असलेल्या राज्यातील 50 टक्के लोकसंख्येवर घातक परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शहरातील सिद्धार्थ बांदोडकर भवनमध्ये शनिवारी आयोजित या बैठकीस आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेसचे क्षीनिवास खलप, तृणमूल काँग्रेसचे समिल वळवईकर, बिगर सरकारी संस्था सेव्ह गोवा सेव्ह म्हादईचे समन्वयक महेश म्हांबरे, म्हादई बचाव आंदोलनाचे प्रजल साखरदांडे, जनासेनाचे जनार्दन भंडारी, गोंयकारपणचे विकास भगत, महेश नाईक, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दि. 16 रोजी सायंकाळी 4 वाजता सांखळीतील पालिका मैदानावर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Stories

टॅक्सींना मोफत मीटर बसवून देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे – चर्चिल

Patil_p

साखळीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

आंबेशी पुलाला झिलेटिनमुळे धोका

Omkar B

ईस्ट बंगालचा आज वास्कोत मुंबईशी मुकाबला

Amit Kulkarni

कदंबच्या 100 बसेस भंगारात जाणार

Amit Kulkarni

शिक्षणाच्या जोरावर मागासलेपणाचा डाग पुसून काढा

Amit Kulkarni