6.1 रिश्टर स्केल तीव्रता ः चक्रीवादळ, पावसाचाही काही भागाला दणका
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
मागील आठवडय़ातील तुर्की आणि सीरियातील हादऱयानंतर बुधवारी न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. वेलिंग्टनमध्येही भूकंपामुळे अनेक लोक भयभीत झाले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. तथापि, या धक्क्यानंतर कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. या आपत्तीनंतर बचावकार्य अजूनही सुरू आहे.
बुधवारी झालेला हा भूकंप नॉर्थ आईसलँड शहर लोअरहाटच्या वायव्येला 78 किमी अंतरावर आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पारापरामू शहरापासून 50 किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के 48 किमी (30 मैल) खोलीवर जाणवल्यामुळे पडझड टळल्याचा दावा भूकंपविषयक सरकारी मॉनिटरिंग संस्था ‘जिओनेट’ने केला आहे.
न्यूझीलंडमध्ये ‘गॅब्रिएल’ चक्रीवादळाचा धोका आठवडाभरापासून व्यक्त केला जात होता. या चक्रीवादळामुळे अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या सरकारने काही भागात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असतानाच भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण गडद झाले आहे. वादळामुळे न्यूझीलंडमध्ये खूप उंच लाटा उसळत आहेत. तसेच मुसळधार पाऊसही पडत असल्यामुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा धोका आहे. आताही पुरामुळे मोठय़ा प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेल्या क्षेत्रांमध्ये नॉर्थलँड, ऑकलंड, तैराविती, बे ऑफ प्लेन्टी, वायकाटो आणि हॉक्स बे यांचा समावेश आहे.
तुर्की-सीरियात मदतकार्य सुरूच
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ढिगाऱयाखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. यासोबतच ढिगाऱयातून मृतदेह काढण्याचे काम सुरू असल्याने मृतांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. 12 फेब्रुवारी रोजी, हजारो इमारती कोसळल्याच्या सहा दिवसांनंतर बचावकर्त्यांनी एक गर्भवती महिला आणि दोन लहान मुलांसह काही लोकांना ढिगाऱयातून जिवंतपणे बाहेर काढले होते.
अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के
तुर्कीतील भूकंपानंतर अफगाणिस्तानातही जोरदार धक्के जाणवले होते. 13 फेब्रुवारीला सकाळी 6.47 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे दक्षिण-पूर्वेला 100 किमी खोलीवर होता.