पुणे / प्रतिनिधी :
मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पॉलिटेक्निची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येथे दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : ‘त्या’ दोघांमुळेच उद्धव ठाकरे आणि 40 आमदारांमध्ये दरी
पाटील म्हणाले, राज्यात 12 हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि सुमारे 27 हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाडय़ा धरून 43 हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’ वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे.