गोवा लोकसेवा आयोगाच्या प्रस्तावास सरकारची मान्यता
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य सरकारच्या प्रशासनातील विविध अधिकाऱयांच्या थेट भरतीसाठी आता गोवा लोकसेवा आयोग वर्षातून एकदाच सामायिक परीक्षा घेणार असून त्याची कार्यवाही या नवीन 2023 वर्षापासून होणार आहे. आयोगाने एकच परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. तो प्रस्ताव सरकारने मान्य केला असून एकच परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आयोगाचे परीक्षेचे काम सोपे आणि सुटसुटीत होणार आहे.
गोवा पोलीस सेवा, गोवा नागरी सेवा व गोवा वनसेवा यातील नोकरभरतीसाठी यापूर्वी जशी पदे मंजूर होत होती तशी परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे वर्षातून अनेकदा परीक्षा घेतली जात होती. तसेच एकच उमेदवार अनेक परीक्षांना बसत होते. प्रत्येक परीक्षेसाठी उमेदवारास व आयोगासही वेगवेगळा आणि ज्यादा खर्च येत होता. तो आता टळणार आहे. या कटकटींना कंटाळून आयोगाने एकच परीक्षा सर्व पदांसाठी घेण्यात यावी असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी दिली आहे. नवीन वर्षात 2023 मध्ये आयोगाच्या परीक्षेत हे नवीन परिवर्तन घडले असून ते उमेदवार आणि आयोगासाठी मोठे लाभदायक ठरणार आहे.