जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेऊन केल्या सूचना : येणाऱया सर्वांची उत्तम प्रकारे बडदास्त करण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यामुळे बेंगळूर येथून सर्व मंत्री, आमदार, अधिकारी हे बेळगावात दाखल होणार आहेत. त्यांची सर्व ती व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष देण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिवेशनच्या तयारी संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत.
बेंगळूर येथून अधिवेशनासाठी सर्व महनीय व्यक्ती बेळगावात येत आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय योग्यप्रकारे करा, याचबरोबर आरोग्याची समस्या उद्भवल्यास तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. मागीलवेळी भरविण्यात आलेल्या अधिवेशनावेळी उत्तम प्रकारे सोय करण्यात आली आहे. त्याचप्रकारे यावेळीही सोय करावी, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले.
यासाठी वेगवेगळय़ा समितींची नियुक्ती करण्यात येणार आहे. अधिवेशन काळात शहर स्वच्छ ठेवणे, वाहतुकीची कोंडी होवू नये याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुवर्णसौध तसेच ज्या ठिकाणी मंत्री, आमदार राहतात त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम प्रकारे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी कोणतीही महनीय व्यक्ती शहरातून जाताना वाहतूक सुरळीत करण्याबाबत अधिकाऱयांना सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. सुवर्णसौध तसेच शहरातील इतर ठिकाणी पार्किंगची सोय करण्याबाबत नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या सर्व महनीय व्यक्तींची राहण्याची सोय करण्याबाबत समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांची नियुक्ती केली आहे. तर आहार समितीच्या अध्यक्षपदी अधिकारी गीता कौलगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सुवर्णसौध बरोबरच शहरामध्ये विविध आरोग्य पथके नेमली जातील. त्यामधून सर्वांना वेळेत उपचार करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक डॉ. प्रवीण बागेवाडी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.