जर तुमचा दात एकदा तुटला तर नवा दात उगविणे अशक्य असल्याचे बोलले जाते. परंतु आता जपानचे वैज्ञानिक एका अशा औषधावर काम करत आहेत, जे रुग्णांना पूर्णपणे नवे दात उगविण्यास मदत करू शकते. हे जगातील पहिले असे औषध असेल जे नैसर्गिक स्वरुपात नवे दात उगविणार आहे. तसेच ते प्रत्येक वयोगटातील लोकांवर प्रभावी ठरणार आहे.
क्योटो विद्यापीठाच्या टोरेगेम बायोफार्मामध्ये हे औषध विकसित करण्यात येत आहे. वैज्ञानिक पुढील वर्षी याचे परीक्षण सुरू करणार आहेत. तर 2030 पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होणार असल्याचे मानले जात आहे.
मनुष्य तसेच प्राण्यांकडे समान स्वरुपात टूथ बड असतो. तो मुलांमध्ये नवे दात निर्माण करण्याची क्षमता बाळगून असतो. परंतु बहुतांश प्रकरणांमध्ये हे बड्स विकसित होत नाहीत आणि अखेरीस गायब होतात. कंपनीने आता याच्याद्वारे अँटीबॉडी औषध विकसित केले आहे. 2018 मध्ये फेरेट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राण्याला वैज्ञानिकांकडून अँटीबॉडी औषध देण्यात आले होते, ज्याच्या परिणामादाखल प्राण्यामध्ये नव्या दातांचा यशस्वीपणे विकास झाला. कंपनी आता एनोडोंटियाच्या रुग्णांवर परीक्षण करण्याची योजना आखत आहे. एनोडोंटिया असा आजार आहे जो जन्मजात असतो. ज्यात काही किंवा सर्व स्थायी दात नसतात. या परीक्षणाच्या अंतर्गत दातांच्या विकासाला प्रेरित करण्यासाठी मुलांना एका इंजेक्शनचा डोस दिला जाणार आहे. ओसाकात टोरेगेम बायोफार्मचे सह-संस्थापक आणि किटानो रुग्णालयाचे डेंटिस्ट कात्सु ताकाहाशी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. कुठल्याही मुलाचे दात गायब झाल्यास जबड्याच्या हाडाच्या विकासावर प्रभाव पडू शकतो. हे औषध अशा समस्यांवर उपाय शोधण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. भविष्यात कॅविटीमुळे दात खराब झालेल्या लोकांनाही औषध उपयुक्त ठरेल असे ताकाहाशी म्हणाले.