कारागृहात बडदास्त ठेवल्याने ‘आप’ तोंडघशी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. भाजपने बुधवारी सोशल मीडियावर सुमारे दीड मिनिटांचा हा व्हिडिओ शेअर केला असून सत्येंद्र जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तसेच ते कारागृह कक्षामध्ये जेवत असून एक व्यक्ती सतत त्यांच्या सेवेत गुंतलेली दिसते. यापूर्वी जैन यांचे 4 व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ते तुरुंगात मसाज करून घेताना दिसले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने 31 मे 2022 रोजी जैन यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. तेव्हापासून जैन तिहार कारागृहामध्ये बंद आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असला तरी 5 महिन्यांत एकदाही त्यांना जामीन मिळालेला नाही. जैन यांच्या कारागृहातील बडदास्तीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालयाने न्यायालयात धाव घेत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला आहे. मंगळवारी न्यायालयात हजेरी सुरू असताना सत्येंद्र जैन यांच्या वकिलाने त्यांना जेवण आणि उपचार योग्य पद्धतीने मिळत नसल्याचा दावा केला होता. कारागृहामध्ये जैन यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे वजन वाढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून आपवर टीकास्त्र
जैन यांच्या जेवणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. जैन यांच्यासंबंधी नव्याने जारी झालेला व्हिडीओ पाहून ते एखाद्या रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवत असल्यासारखे वाटते. तसेच हवालाबाजांना तुरुंगात कोणताही त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी केजरीवाल यांनी घेतल्याचेही भाजपने म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी मसाजचा व्हिडिओ समोर
19 नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांमध्ये जैन यांचा कारागृहात मसाज केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये सत्येंद्र जैन तिहारमध्ये मसाज करून घेताना दिसत होते. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.