प्रतिनिधी /बेळगाव
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रस्त्यांचा मार्ग बदलला आहे, हे सूचित करण्यासाठी पोलीस बॅरिकेड्सचा वापर करतात. परंतु, सध्या हे बॅरिकेड्स कोणत्याही कारणासाठी वापरले जात असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
अलीकडच्या काळात रस्ते अडविण्याऐवजी खड्डे झाकण्यासाठी बॅरिकेड्सचा वापर केला जात आहे. बऱयाच ठिकाणी बॅरिकेड्सचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी व्हावा हे तर हास्यास्पद आहे. परंतु, आता गटार फुटले, खड्डा पडला तर नागरिकांच्या लक्षात येण्यासाठी तेथे बॅरिकेड्स घातले जात आहेत.
कॅम्प चर्च स्ट्रीट येथे असेच एक गटार फुटले आहे. त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर बॅरिकेड्स घालून तात्पुरता उपाय शोधला गेला आहे. शहरात हेच चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र, ना महानगरपालिका ना पोलीस प्रशासन बॅरिकेड्सचा होणारा दुरुपयोग थांबवत आहे. सरकारी मालमत्तेचा असा वापर कितपत व्यवहार्य आहे? असा प्रश्न नागरिक करत आहेत.