ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे माजी लोकसभा खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.
ते आपले ट्विटमध्ये म्हणाले की, प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांची महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी NSD च्या अध्यक्षपदी निवड केली आहे. रावल यांच्या प्रतिभावान आणि अनुभवाचा लाभ देशातील कलाकारांना आणि विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांचे हार्दिक अभिनंदन!
सध्या या पदावर राजस्थानी कवी अर्जुन चरण हे कार्यरत असून लवकरच परेश रावल पदभार स्वीकारतील. चरण हे 2018 मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परेश रावल म्हणाले की, या पदावर काम करणे आव्हानात्मक आणि आनंददायी असेल. मी या पदावर असेपर्यंत सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन कारण हे क्षेत्र मी जवळून पाहिले असून, याची मला पूर्णपणे माहिती आहे.
दरम्यान, 65 वर्षीय परेश रावल यांना पद्मश्री पुरस्कारासह, राष्ट्रीय पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे हेराफेरी, चाची 420, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हंगामा, सर, वो चोर की, ओ माय गॉड, सरदार वल्लभाई पटेल यासारखे अनेक चित्रपट हिट आहेत.