किम जोंग यांचा उत्तर कोरियाच्या नागरिकांना संदेश
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी स्वतःच्या देशवासीयांकरता एक संदेश जारी केला आहे. कुठल्याही क्षणी आण्विक हल्ला करण्यासाठी सज्ज रहावे. दक्षिण कोरियासोबत अमेरिका स्वतःच्या अण्वस्त्रांसोबत संयुक्त सैन्याभ्यास करत आहे, यानंतर कधीही युद्ध सुरू होऊ शकते असे किम यांनी या संदेशात म्हटले आहे.
आम्हाला युद्ध रोखण्यासाठी कुठल्याही क्षणी आण्विक हल्ला करण्याकरता सज्ज रहावे लागणार असल्याचे म्हणत किम यांनी अमेरिकेवर युद्धखोरीचा आरोप केला आहे. यापूर्वी उत्तर कोरियाने शनिवारी आणि रविवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले होते. किम यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्या मुलीसोबत एका परीक्षणाची पाहणी केली होती.
उत्तर कोरियाच्या सैन्याच्या युद्धक्षमतेत मोठी सुधारणा झाली आहे. तत्काळ आणि प्रत्युत्तरादाखल आण्विक हल्ल्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया स्वतःची आक्रमकता दाखवत असल्याने आम्हला आण्विक युद्ध प्रत्युत्तर क्षमता वेगाने मजबूत करावी लागत असल्याचे किम यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात लवकरच सैन्याभ्यास आयोजित होणार आहे.