दोन अल्पवयीनसह चौघांवर गुन्हा
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे येथे झालेल्या एका पार्टीदरम्यान महिलेचा होणाऱ्या पतीसोबत अश्लिल व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेच्या ही घटना लक्षात येताच तिने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीनसह चौघाजणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
शहर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपींपैकी एकाला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, नाचणे येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत तक्रारदार महिला ही त्याच्या होणाऱ्या पतीसह उपस्थित होती. तसेच येथे आरोपी पुरूष तसेच त्याची मैत्रिण व अन्य दोन अल्पवयीन उपस्थित होते. पार्टी सुरू असतानाच तक्रारदार व तिचा होणारा पती एका खोलीत असताना त्यांचा अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आला, असा संशय या महिलेला आल़ा आपला व्हिडीओ संबंधितांकडून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला, असा संशय पीडित महिलेला आला. त्यानुसार या महिलेने चौघा संशयितांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी एक पुरूष, त्याची मैत्रीण व 2 अल्पवयीन याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 (ब), 354 (क) नुसार गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.