खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन : युवा आघाडी तसेच तालुक्यातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी होणार
प्रतिनिधी /खानापूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 9.30 वाजता खानापूर स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, तसेच हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा, असे आवाहन म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सीताराम बेडरे यांनी केले आहे.
या अभिवादन कार्यक्रमात म. ए. समिती युवा आघाडी तसेच तालुक्यातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दरवर्षी तालुक्यातील म. ए. समितीचे दोन्ही गट हुतात्मा दिन वेगवेगळे करत होते. म. ए. समितीमध्ये एकीची घोषणा मध्यवर्ती समितीने केली आहे. त्यामुळे तालुक्यात समिती कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजचा हुतात्मा दिन हा विशेष गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता स्टेशनरोडवरील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व समिती कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेऊन कडकडीत हरताळ पाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात हुतात्मा दिनाबाबत जागृती फेरी
म. ए. समितीच्यावतीने 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कणकुंबी, जांबोटी, हब्बनहट्टी, ओलमणी, नंदगड, हलशी, कारलगा, शिवोली, चापगाव, कुप्पटगिरी, निडगल आणि गर्लगुंजी तसेच खानापूर शहरातही पत्रके वाटून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागृती फेरीत अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सीताराम बेडरे, समिती नेते प्रकाश चव्हाण, माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, निरंजन देसाई, गोपाळ पाटील, विठ्ठल गुरव, रणजित पाटील, मुरलीधर पाटील, पिराजी पाटील, सूर्याजी पाटील, ब्रम्हानंद पाटील, सदानंद पाटील, पुंडलिक पाटील, राजाराम देसाई, बळवंत पाटील, अरुण धबाले, चुडाप्पा सुतार, गोपाळ सुतार, पिराजी मादार, इराप्पा मादार, श्रीधर कडबी, संतोष धबाले, दयानंद तेली, बाजीराव पाटील, रमेश धबाले, बाळाप्पा धबाले, भास्कर पाटील, मष्णू चोपडे, अनिल बेळगावकर यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता तालुक्यातील समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्टेशनरोड येथील हुतात्मा स्मारकाकडे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.