काकती भागातील स्थिती : अपघात होण्याचा धोका : पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष
वार्ताहर /काकती
येथील राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने जागोजागी थांबत असल्याने मार्गक्रमण करणाऱया प्रवासी वाहनांना अडथळा होत आहे. ऑईल सर्व्हिसिंगसाठी अवजड वाहने थांबलेली आहेत. हे लांबून समजत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत आहेत. काकती पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले असून बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.
काकती येथे मोटार-ट्रक बांधण्याच्या व्यावसायिकांची गॅरेजीस मोठय़ा प्रमाणात आहेत. या महामार्गाच्या ठिकाणी ऑईल सर्व्हिसिंगची संसाधने मांडून काहीजण व्यवसाय करीत आहे. अवजड वाहने ऑईल सर्व्हिसिंगकरिता महामार्गावर थांबवली जात आहेत. परिणामी महामार्गावर अथळा निर्माण होत आहे. सुसाट धावणाऱया वाहनांना अडथळा पार करून पुढे जाणे धोक्याचे झाले आहे. परिणामी वाहनांवरील नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात होताना कधी जीवालाही मुकावे लागत आहे.
थांबलेल्या गाडय़ांच्या समोरून पादचारी जात असताना आडोसा होत आहे. यामुळे पादचारी स्पष्ट दिसत नसल्यानेदेखील अपघातांचे प्रसंग घडत आहेत. काकती पोलीस ठाणे राष्ट्रीय महामागाला लागूनच असूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, असे ग्रामस्थांतून बोलले जात
आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका
ऑईल सर्व्हिसिंग करणाऱया वाहनांनी सर्व्हिस रोडवरील आस्थापनासमोर थांबून सर्व्हिसिंग केल्यास अडथळा होणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेदेखील सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करून पार्किंगची सोय करावी.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहने महामार्गावर न थांबवता सर्व्हिस रोडच्या बाजूला थांबवावीत. काकती पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता राष्ट्रीय महामार्गावर थांबविलेल्या वाहनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.