वृत्तसंस्था/ मलप्पूरम, केरळ
75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारच्या सामन्यात ओडिशाने मणिपूरचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. एकमेव निर्णायक गोल पूर्वार्धात कार्तिक हंटलने नोंदवला.
ओडिशाने या सामन्यात वर्चस्व राखले होते. त्यांच्या शानदार खेळामुळे मणिपूरला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ पूर्ण आत्मविश्वासाने या सामन्यात उतरले होते. याआधीच्या सामन्यात मणिपूरने विद्यमान विजेत्या सेनादलाचा 3-1 असा पराभव केला होता तर ओडिशाने कर्नाटकवर 3-0 अशी मात केली होती. दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांच्या प्रशिक्षकांनी सामन्याआधी म्हटले होते. ओडिशाने सर्वप्रथम आक्रमणाला सुरुवात करीत त्यांनी लोफ्टेड थ्रू पास मणिपूर डिफेन्सच्या मागे मारला. मणिपूरचा गोलरक्षक एमडी अबुजरलाही वारंवार सावध रहावे लागत होते.
गोल करण्याची पहिली संधी मिळाली ती ओडिशाला. एक लोफ्टेड थ्रू बॉल अबुजरने क्लीअर केला. पण तो चेंडू कार्तिक हंटलच्या पुढय़ात पडला. मात्र त्याला डाव्या पायाने तो अचूक अडविता आला नाही आणि हा चेंडू शेवटी बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली. मणिपूरने लाँग पासेसवर जास्त भर दिल्याचे दिसून येत होते. एका फ्री किकवर त्यांना चांगली संधी मिळाली होती. निंगथौजम मोमोचा सिंगने मारलेली फ्री किक ओडिशाचा गोलरक्षक चिन्मय शेखर बेहेराने क्लीअर केला. पण बॉक्समध्ये झालेल्या गोंधळात चेंडू सोमिशन शिराकच्या जवळ पडला. त्याने तो गोलजाळय़ात अचूक मारला. पण पंचांनी त्याला ऑफसाईड ठरवित हा गोल नाकारला.
37 व्या मिनिटाला ओडिशाला पहिले यश मिळाले. कार्तिक हंटलने मणिपूरचा सेंटरबॅक एन.रोमेन सिंगला हुलकावणी देत सेंटरमधून आगेकूच केली आणि अबुजरला चकवत हा गोल नोंदवला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. उत्तरार्धात मणिपूरने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण ओडिशाचा गोलरक्षक व बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही. त्यांनी शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवत विजय साकार केला. त्यांचा हा या स्पर्धेतील पहिला विजय आहे. गट ब मध्ये त्यांचे आता दोन सामन्यांतून 4 गुण झाले असून मणिपूरचे 3 गुण झाले आहेत. गुरुवारी मणिपूरची लढत गुजरातविरुद्ध होणार आहे.