वृत्तसंस्था/ पुणे
म्हाळूंगेच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पहिल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात निलेश जाधवच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओडिशा जॉगरनॉटस्ने राजस्थान वॉरियर्सचा पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात गुजरात जायंटस्ने तेलगू योद्धाजवर थरारक विजय मिळविला.
ओडिशा आणि राजस्थान वॉरियर्स यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सुरुवातीला राजस्थान वॉरियर्सने ओडिशावर 27-21 अशी आघाडी पहिल्या इनिंग अखेर घेतली होती पण त्यानंतर निलेश जाधवच्या शानदार कामगिरीमुळे ओडिशाने राजस्थान वॉरियर्सचा 51-45 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला. निलेश जाधवने 16 गुण मिळविले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता ओडिशा जॉगरनॉटस् चौथ्या स्थानावर आहे. ओडिशाचा कर्णधार दिपेश मोरेने 21 गुण मिळविले. राजस्थान संघातर्फे दिलराज सिंग सेनेगर आणि अक्षय गणफुले यांची कामगिरी दर्जेदार झाली.
या स्पर्धेतील शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस्ने तेलगू योद्धाजचा 48-46 अशा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात पहिल्या इनिंग अखेर दोन्ही संघ 27-27 असे बरोबरीत होते. सात मिनिटे बाकी असताना तेलगू योद्धास संघ गुजरातपेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर होता. त्यानंतर रेड्डीने तेलगू संघाचे तीन गडी बाद करून आपल्या संघाला तीन महत्त्वाचे गुण मिळवून दिले. या कामगिरीमुळे शेवटी गुजरात जायंटस्ने तेलगू योद्धाजचे आव्हान संपुष्टात आणले.