Tarun Bharat

‘गुगल-अल्फाबेट’ची मोठी कर्मचारी कपात

जागतिक पातळीवर 12 हजार कर्मचाऱयांना कमी करणार

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

अनेक जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुगल या जगप्रसिद्ध कंपनीची मातृकंपनी असणाऱया ‘अल्फाबेट’ कंपनीने मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीच्या एकंदर कर्मचारी संख्येपैकी 6 टक्के, म्हणजेच साधारणतः 12 हजार कर्मचाऱयांना घरी जाण्यास सांगण्यात येणार आहे. गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली. ही कर्मचारी कपात जागतिक पातळीवर केली जाणार आहे.

कर्मचारी कपातीच्या या निर्णयामुळे अल्फाबेट कंपनीच्या समभागांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. गेल्या एक वर्षात सातत्याने कंपनीचे समभाग घसरत असून ही घसरण गेल्या 12 महिन्यांमध्ये 30 टक्के इतक्या प्रमाणात झाली होती. मात्र, शुक्रवारी कर्मचारी कपातीची घोषणा झाल्यानंतर समभागांचे दर 1.8 टक्के वाढल्याचे दिसून आले. ही वाढ पुढील आठवडय़ातही सुरु राहील अशी शक्यता आहे. कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याची शक्यता गृहित धरुन समभागांच्या किमतीत वधार झाला असावा असे मत व्यक्त होत आहे.

सर्वंकष सर्वेक्षणानंतर निर्णय

कर्मचारी कपातीचा निर्णय जागतिक पातळीवर कंपनीच्या सर्व उत्पादनांची पायाभूत स्थिती लक्षात घेऊन आणि सर्वंकष सर्वेक्षणाअंती करण्यात आला आहे. कंपनीचे हित आणि कर्मचाऱयांची आर्थिक सुरक्षा यांचा समतोल विचार करुन कपात होणाऱया कर्मचाऱयांची संख्या ठरविण्यात आली आहे. कंपनी आणि कर्मचारी यांच्या हिताला प्राधान्य हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. ही कपात करताना आम्हाला आनंद झालेला नाही. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मी या परिस्थितीचे पूर्ण उत्तरदायित्व स्वीकारतो. मात्र आम्हाला भविष्याचा दीर्घकालीन विचार करुन हा कटू निर्णय घ्यावा लागत आहे. जागतिक मंदीची परिस्थिती आणि इतर अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत. काही घटक कंपनीच्या हातातील नाहीत. पण त्यांचा परिणाम सहन करावा लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थापनास समजून घ्यावे, असे भावनात्मक आवाहन पिचाई यांनी केले.

कर्मचाऱयांना ईमेल संदेश

ज्या कर्मचाऱयांना कमी केले जाणार आहे, त्यांना कंपनीच्या वतीने ईमेल संदेश पाठविण्यात आला आहे. सध्याच्या जटील जागतिक परिस्थितीच्या रेटय़ामुळे ही कपात करावी लागल्याचे या संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेतील कर्मचाऱयांना संदेश पाठविण्यात आले असले तरी इतर देशांमधील कर्मचाऱयांना संदेश पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक देशात कर्मचारी कायदे भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाच्या कायद्याशी मेळ घातल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Related Stories

हवा, पाणीबदलाचा परिणाम होतोय मारक, 44 आरोग्य समस्या

Patil_p

युरोप ठरले कोरोना संक्रमणाचे केंद्र

Patil_p

फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा नवा संकरावतार

Patil_p

स्वतःचे शिर कापणारा विचित्र सागरी जीव

Patil_p

जगातील पहिला रोबोट चित्रकार

Amit Kulkarni

कधीच पूर्ण न झालेला 4 अब्जाचा महाल

Patil_p