ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात सार्थक कापडी याने केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता कापडी याच्यावर नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडी हा ठाकरे गटाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सार्थक कापडी याने 18 फेबुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, “एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगावं लागणार आहे. तुला एका बापाने जर काढला असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव आणि हो तुमच्यासारख्या फालतू लोकांचा बाप कुठे एक असतो हजारो असतात”
यासोबतच त्याने आणखी एक ट्विट केले होते. त्यामध्ये “एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही, तुझा बाप बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे”, असे त्याने म्हटले होते.
या ट्विटमुळे शिंदे गट पेटून उठला होता. आमदार कृष्णा खोपडे यांनी कापडी याच्याविरोधात नागपूर पोलिसात तक्रार दिली होती. खोपडेंच्या तक्रारीनंतर कापडी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कापडी हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचे खोपडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.