संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराचे साम्राज्य : वीजबिलाची रक्कम नियमित भरण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने विद्युतबिलाची रक्कम भरली नसल्याने दुसऱयांदा पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे संपूर्ण कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले असून नियमित वीजबिलाची रक्कम भरण्याची सूचना केली.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने विद्युतबिलाची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकली आहे. त्यामुळे हेस्कॉमने कॅन्टोन्मेंटमधील पथदीपांचा विद्युतपुरवठा बंद केला आहे. या विषयावर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर विद्युतपुरवठा का बंद करण्यात आला आहे? अशी विचारणा ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसह अन्य अधिकाऱयांना केली. यावेळी विद्युतबिलाची चार कोटींची रक्कम थकली असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून एसएफसी अनुदानांतर्गत निधी मंजूर करण्यात येत आहे. तरीदेखील विद्युतबिलाची रक्कम का भरली नाही? असा जाब ब्रिगेडियर मुखर्जी यांनी अधिकाऱयांना विचारला.
हेस्कॉमकडे पाठपुरावा करून विद्युतपुरवठा सुरू करा
नियमितपणे विद्युतबिलाची रक्कम भरली जात आहे. पण यापूर्वी विद्युतबील भरले नसल्याने थकबाकी वाढल्याची माहिती कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांनी दिली. तरीदेखील अध्यक्ष समाधानी झाले नाहीत. शासनाकडून मिळालेला निधी हेस्कॉमला भरण्यात यावा, अशी सूचना अधिकाऱयांना केली. याबाबत हेस्कॉमकडे पाठपुरावा करून विद्युतपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी सूचना केली. पथदीपांअभावी कॅन्टोन्मेंट परिसरात अंधार पसरला आहे. मुख्य रस्त्यांवर अंधार पसरल्याने पादचाऱयांना नाहक त्रास होत आहे. विशेषतः राजेंद्र प्रसाद चौक ते युनियन जिमखानापर्यंतच्या रस्त्यावर अंधार पसरत आहे. या परिसरात बसथांबे असल्याने ग्रामीण भागात जाणारे नागरिक या ठिकाणी बससाठी थांबतात. पण सध्या अंधार पसरल्याने खूपच त्रास होत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उशीर झाल्यास अंधारात थांबावे लागते. तसेच बाजार परिसरातील नागरिकांनाही अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पथदीप सुरू करणे आवश्यक आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट अध्यक्षांनी अधिकाऱयांना विविध सूचना केल्या आहेत. याची दखल अधिकारी घेणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या कार्यक्रमासाठी काही भागातील पथदीप सुरू
कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप बंद झाल्याने सर्वत्र अंधार पसरलेला आहे. मात्र मराठा लाईट इंन्फट्रीतर्फे रियुनियन सोहळा आयोजित केला असल्याने पथदीप सुरू करण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱयांची भेट घेण्याची सूचना ब्रिगेडिअरनी केली होती. याची दखल घेउन हेस्कॉमच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून पथदीप सुरू करण्याची विनंती केली असता, शुक्रवारी काही परिसरातील पथदीप सुरू करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डने पथदीपाच्या बिलाची चार कोटी बिलाची रक्कम भरली नाही. बिल भरण्यासाठी सातत्याने नोटीस बजावण्यात आली होती. पण कॅन्टोन्मेंटने बिलाची रक्कम भरली नसल्याने गेल्या दोन दिवसापासून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेट परिसर पुर्णपणे अंधाराच्या विळख्य़ात सापडला आहे. मराठा लाईट इंन्फट्रीच्यावतीने रियुनियन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याकरिता देशातून विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पण कॅन्टोन्मेंट परिसरात अंधार पसरला आहे. कार्यक्रमासाठी मिलिटरीच्यावतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम हाती घेवून रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे. पण परिसरात अंधार पसरल्याने पथदीपांचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱयांची भेट घेवून पथदीप सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना ब्रिगेडिअरनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांना केली होती. पण याची दखल घेवून कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी, साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी हेस्कॉमच्या व्यवस्थापक संचालकांना संपर्क साधून वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. मराठा लाईट इंन्फट्रीच्या कार्यक्रमांसाठी कॅन्टोन्मेंट परिसरातील काही पथदीप शुक्रवारी सायंकाळी सुरू केले.