Tarun Bharat

जुना धारवाड रोड बनला मृत्यूचा सापळा

अर्धवट कामांमुळे होताहेत अपघात : खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीची समस्या : रस्ता दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र ही कामे व्यवस्थित करण्यात येत नसल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महात्मा फुले रोड जुन्या धारवाड रोडला जोडण्यात आला. पण याठिकाणी रॅम्प बनविण्यात आले नाही. तसेच याठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

महात्मा फुले रोडचे रुंदीकरण एसपीएम रोडपर्यंत केले होते. पण अलीकडेच पुढील रस्त्याचे काम हाती घेऊन जुन्या धारवाड रोडपर्यंत रुंदीकरण करण्यात आले आहे. गोवावेस बसवेश्वर चौकापासून सुरू होणारा रस्ता जुन्या धारवाड रोडला जोडण्यात आला आहे. पण रोड जोडलेल्या ठिकाणी व्यवस्थित रॅम्प करण्यात आले नाही. त्यामुळे वाहने वळविताना अडचण होत आहे. अशातच धारवाड रोडवर खड्डे निर्माण झाले असून येथील खड्डे फुटाचे बनले आहेत. यामुळे विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेला रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. यामुळे याठिकाणी अपघात होऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

हा रस्ता जुन्या धारवाड रोडला जोडल्याने शहरात ये-जा करणाऱया वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. यामुळे रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी व वडाप वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ नेहमी असते. मात्र रस्ता व्यवस्थित नसल्याने वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीसह अपघात घडत आहेत. तसेच फोर्ट रोड परिसरात अवजड वाहनांच्या दुरुस्तीचे व ट्रक बॉडीबिल्डींगची गॅरेज असल्याने रस्त्यावर अवजड वाहने थांबलेली असतात. यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडचण निर्माण झाली आहे. बंद पथदीप व खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून जीव गेल्यानंतरच दुरुस्तीचे काम करणार का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.

Related Stories

बुद्धांचा अवमान करणाऱया मंत्र्यांवर कारवाई करा

Patil_p

बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला

Tousif Mujawar

शहराच्या विकासासाठी प्रयत्न करा : आमदार अनिल बेनके यांनी नगरसेवकांना केले आवाहन

Rohit Salunke

गणेशोत्सवाच्या तयारीत विजेचा ‘खो’

Amit Kulkarni

सिलिंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्तांचा आलेख कमी होताच मास्क झाले गायब

Patil_p