प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वंटमुरी ओव्हरब्रिजवर शनिवारी पहाटे झालेल्या साखळी अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर आणखी एक युवक जखमी झाला. ट्रकची कार, टाटा गुड्स वाहनांना धडक बसली. त्यानंतर या गुड्स वाहनाची आयशरला तर आयशरची आणखी एका ट्रकला धडक बसली.
एकूण पाच वाहनांची एकमेकांना धडक बसल्याने या अपघाताच्या मालिकेमुळे पहाटे महामार्गावर काही काळ वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. शनिवारी सकाळी काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस., उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद पुढील तपास करीत आहेत.
मकबुलअहम्मद खाजासाब दर्गा (वय 75, रा. यल्लापूर, जि. कारवार) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव असून टाटा गुड्स वाहनामधून हा वृद्ध प्रवास करीत होता. तर या वाहनाचा चालक मोहम्मदअजीज बुडनसय्यद (वय 34) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी ट्रकचालक सुनील सदाशिव शिंदे (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.