बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा; न्यायालयातूनच घेतले ताब्यात ः 50 लाख रुपये दंड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच 50 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. कारावास आणि दंड ठोठावण्याबरोबरच चौटाला यांची हेली रोड, पंचकुला, गुरुग्राम, असोला येथील मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा जाहीर केली. 21 मे रोजी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. सीबीआयने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्यांच्याविरोधात 106 साक्षीदार हजर केले होते. सीबीआयने 2005 मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर 26 मार्च 2010 रोजी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्या शिक्षेवर गुरुवार, 26 मे रोजी निर्णय होणार होता. मात्र, अपंगत्वाचे कारण पुढे करत चौटाला यांनी न्यायालयासमोर आणखी एक अर्ज सादर केल्याने शिक्षेची सुनावणी एक दिवस लांबणीवर टाकण्यात आली होती. तसेच आरोपींनी वैद्यकीय अहवालासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र आता सदर वैद्यकीय चाचण्या त्यांना कारावासाच्या शिक्षेदरम्यानच कराव्या लागतील, असे न्यायालयाने सांगितले.
बचाव पक्षाने अपंगत्वाच्या आधारावर सहानुभूतीची याचिका दाखल सादर करत कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका न स्वीकारता सिद्ध झालेल्या गुन्हय़ांना अनुसरून शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारच्या सुनावणीवेळी मुलगा अभय चौटाला आणि नातू अर्जुन हेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अभय चौटाला यांनी वकिलांशी चर्चा करून उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.
जेबीटी घोटाळय़ात यापूर्वीही शिक्षा
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 86 वषीय माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळय़ात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. या भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ते गेल्यावषी 2 जुलै रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर आता त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले. 1993 ते 2006 दरम्यान चौटाला यांनी 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता जमवली होती. ही संपत्ती त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत खूपच जास्त होती. मात्र, चौटाला कुटुंबीय नेहमीच यासंबंधीच्या आरोपांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत होते.
3.68 कोटींची मालमत्ता जप्त
2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये त्यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथील आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगअंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली.