थकबाकीदारांचे दिवाळं निघणार, तब्बल 1 हजार जणांची थकबाकी लाखावर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेची वसुली मोहिम ही दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात सुरु होत असते. जे थकबाकीदार असतात त्यांची नळ कनेक्शन कट करण्यापासून त्यांची प्रॉपर्टी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असते. परंतु यावर्षी दिवाळीमध्येच वसुली मोहिम राबवण्याचे आदेश सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी वसुली विभागाला दिले आहेत. त्यामुळे वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर हे ऍक्शन मोडवर काम करु लागले आहेत. त्यांनी एक लाखाच्यावर जे थकबाकीदार आहेत. त्यांची यादी काढून प्रत्येक भाग निरीक्षकाला दिली आहे. त्यांना 101 ची नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु आहे. तब्बल 1 हजारहून अधिक जण 1 लाखाच्यावरचे थकबाकीदार आहेत.
सातारा पालिकेचा नियमित कर भरणारा करदाता हा सर्वसामान्य वर्गातील असतो. मोठय़ा बिल्डींगमध्ये राहणारे हे बुहतांशी कर बुडवेच असतात. त्याचा प्रत्यय पालिकेच्या वसुली विभागाला दरवर्षी अनुभवायला येतो. दरवर्षी पालिकेच्या वतीने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वसुली मोहिम सुरु होते. परंतु यावर्षी दिवाळीच्या अगोदरच वसुली विभागाला मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या सुचनेनुसार वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर यांनी वसुली विभागातील सर्वच भाग निरीक्षकांना 1 लाखाच्यावरचे थकबाकीदारांची यादी काढून दिली आहे. त्या यादीतील सर्वांना 101 ची नोटीस बजावण्याचे काम सुरु आहे. काहींचे नळ कनेक्शनही कट करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर थकबाकीदारांचे दिवाळे काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जो मोठा थकबाकीदार आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करुन त्याच्याकडून कर वसुल करण्याची मोहिम सुरु आहे. त्याकरता प्रत्येक भाग निरीक्षकाला तशा सूचना दिल्या आहेत.
तब्बल 1 हजारहून जास्त 1 लाखाच्या पुढचे थकबाकीदार
सातारा शहरात अनेक बिल्डर, धनदांडग्यांकडून पालिकेची घरपट्टी, नळपट्टी थकवण्याचे प्रकार सुरु आहेत. यांची यादीच काढून भाग निरीक्षकांना दिली आहे. 1 हजारहून अधिक जण 1 लाखाच्या पुढचे थकबाकीदार आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु होणार आहे.
थकबाकीदारांनी कर भरावा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांनी आपला थकीत कर भरावा.. कारवाई टाळावी, अन्यथा पाणी कनेक्शन व मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही होवू शकते. ती कारवाई टाळायची असेल तर पालिकेकडे कर जमा करावा.
प्रशांत खटावकर, वसुली अधिकारी
तिजोरीत खडखडाटाची चर्चा
पालिकेकडून यावर्षी प्रथमच दिवाळीच्या तोंडावर वसुली मोहिम तीव्र करण्यात आल्याने वेगवेगळय़ा अफवा सुरु आहेत. त्यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱयांना बोनस, सानुग्रह अनुदान देण्याकरता पालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे ही मोहिम सुरु आहे, अशीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून असे सांगण्यात आले की सानुग्रह अनुदान आणि ऍडव्हान्ससाठी बजेटमध्ये तरतूद करुन ठेवण्यात आलेली आहे. पालिकेची तिजोरीत कसलाही खडखडाट झाला नसून दिवाळीमध्ये लोकांच्याकडे पैसे असतात म्हणून ही मोहिम आखली आहे, असेही सांगण्यात आले.