प्रतिनिधी /काणकोण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या सेवा पंधरवडय़ाच्या पहिल्या दिवशी शनिवारी काणकोण तालुक्यातील किनारपट्टीची सफाई करून स्वच्छ भारत मोहीम राबविण्यात आली. या मतदारसंघातील आगोंद, पैंगीण आणि लोलये पंचायतीने अनुक्रमे आगोंद, गालजीबाग, तळपण आणि पोळे किनारपट्टीवर सफाई मोहीम राबविली. त्यात सरपंच, पंच त्याचप्रमाणे भाजपाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले. खोतीगाव पंचायतीने स्थानिक सरकारी माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पंचायत परिसर त्याचप्रमाणे खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान परिसराची सफाई केली.
काणकोण नगरपालिका क्षेत्रात नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, उपनगराध्यक्ष लक्ष्मण पागी, अन्य नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी यांच्यासहित चार रस्ता ते पाळोळेपर्यंत जागृती फेरी काढण्यात आली. या जागृती फेरीत चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय, श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय, शेळेर येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, देळे येथील श्री मल्लिकार्जुन श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय, चावडीवरील सेंट तेरेझा विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या फेरीत सहभागी झालेल्या सर्वांनी पाळोळे किनाऱयाची सफाई केली आणि ‘स्वच्छ भारत, स्वच्छ गोवा’ ठेवण्याची शपथ घेतली.
राजबाग, किंदळेबाग येथील किनाऱयाची सफाई करण्याची जबाबदारी ललित रिसॉर्टने स्वीकारली, तर कोळंब-पाटणे येथील किनाऱयाची सफाई स्थानिक नगरसेवक शुभम कोमरपंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील मोखर्ड येथील बलराम डे केअर शाळा, श्रीस्थळ येथील सरकारी माध्यमिक शाळेतील विद्याथीं, शिक्षक, श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच, पंच त्याचप्रमाणे भाजप मंडळाचे पदाधिकारी यांनी श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान परिसरात त्याचप्रमाणे पंचायत इमारत परिसरात सफाई केली. काणकोण भाजप मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येऊन त्यात मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, अन्य पदाधिकारी सहभागी झाले.