Tarun Bharat

अमृत महोत्सवाच्या पायरीवर

Advertisements

देश अमृत महोत्सवाच्या पायरीवर उभा आहे. आजच्याच तारखेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, भारताच्या कपाळावर फाळणीची रेषा ओढण्यात आली होती. ती जखम घेऊन वाटचाल करताना भारत कधीही डोकं धरून बसला नाही. उलट त्याने येणाऱया प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी घटनात्मक चौकट आखून घेतली आणि गौरवपूर्ण वाटचाल सुरू केली. म्हणूनच सख्ख्या शेजाऱयांच्याकडे लागू होते तशी लष्करी राजवट आणि लष्करी उठावाद्वरे सत्तांतर होण्याचा प्रयोग इथे झाला नाही. देशाच्या घटनेपेक्षा वरचढ ठरू लागणाऱयांना इथल्या जनतेने मतपेटीतून उत्तर दिले आणि देत आहे. स्वातंत्र्यानंतर पंजाबचा सुजलाम, सुफलाम भाग पाकिस्तानात गेला असताना भाक्रानांगल पासून देशात सुरू झालेली धरण उभारणीची मालिका असो, त्यातून दुष्काळ मुक्ती, अन्नधान्याची उपलब्धता असो किंवा आर्थिक घडी बसवण्याचे आणि त्यातून सर्व क्षेत्रात प्रगतीचे उद्दिष्ट गाठणे असो, पंचवार्षिक योजनांमधून ते सुरू झाले आणि जिथे स्वातंत्र्याच्या आरंभी गाडीवाट निर्माण केलेली असेल तिथे कालांतराने सुधारणा घडवत आता तिथेच महामार्ग आणि त्याच महामार्गावर विमान उतरवण्या इतकी प्रगती आपण साधली आहे. नव स्वतंत्र देशाने आर्थिकदृष्टय़ा डाव्या बाजूला झुकावे की उजवीकडे या विवंचनेत अडकून न पडता मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांना प्रगतीचे पंख जोडले गेले! जेव्हा बदलाची वेळ आली, तेव्हा आपल्या अभ्यासातून ही स्थिती बदलली पाहिजे असे मत मांडणाऱया विचारवंतालाच मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याची जबाबदारी या देशात सोपवली गेली. या क्षेत्रातली वाटचाल कधी हवीशी तर कधी नकोशी वाटण्याची दोलायमान स्थिती असतानाही या देशाचा अर्थ गाडा धावतो आहे हे विशेष! कृषी, औद्योगिक, सहकार, विज्ञान तंत्रज्ञान, संशोधन अशा क्षेत्रात भरारी घेण्यात देश कुठेही मागे नाही. तो कधीकाळी देवीचा रोग आणि प्लेगच्या साथीत होरपळला होता आणि आज तो परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देशात जगाला पुरवठा करता येतील अशी लस निर्माण करण्यात योगदान देतो आहे! जगाचे उपग्रह अविश्वसनीय अशा किंमतीत आपला देश अवकाशात स्थापित करून देतो आणि त्याची या क्षेत्रातील अचूकता इतरांच्या तुलनेने कितीतरी अधिक चांगली आहे, हे अभिमानपूर्वक सांगता येते. एकेकाळी आठवडय़ातून एकदा गहू आणि तांदूळ खाऊ नका असे आवाहन करायला लागणारे देशात आज मुबलक अन्न निर्माण होते आहे. जग आपल्याकडे आशेने पुरवठादार म्हणून पाहतो आहे आणि भूक व भूकबळी ते प्रगतीचे मोजमाप करण्याची नोबल पद्धत जग आपल्या विचारवंतांना विचारून नक्की करत आहे. संगणकाच्या क्षेत्रातील आपल्या प्रगतीला वेसन घातले जात आहे हे लक्षात आल्यानंतर परम संगणक निर्माण करण्याची क्षमता असणारे इंजिनियर्स आपल्याच देशात आपण घडवू शकलो. अनेकदा लष्करी सामर्थ्याचा पुरावा आपण जगाला दिला आणि त्याचवेळी शेजारच्या तिबेट, नेपाळ, भूतान, श्रीलंकेसारख्या शेजाऱयांच्या अस्तित्वावर घाला येऊ दिला नाही. शेजाऱयांशी घनि÷ संबंध आणि त्यांच्या प्रगतीत योगदान हे आपले वैशिष्टय़ ठरले. पाकिस्तानच्या जोखडातून अवघ्या 14 दिवसात बांगलादेश नावाच्या राष्ट्राच्या निर्मितीचा चमत्कार आपण जगाला घडवून दाखवला. जागतिक महासत्ता विरोधात असताना केलेली ही कामगिरी होती. युद्धात चीनने भारताला अपमानित केले तेव्हा हिमालयाच्या मदतीला धावलेल्या सह्याद्रीच्या पत्थराने युद्ध फक्त सैनिक करत नाहीत, त्या देशातील कामगाराशी आपल्या देशातील कामगाराचे, तिथल्या शिक्षकांशी आपल्या शिक्षकाचे असे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचे दुसऱया देशातील व्यक्तीशी आपापल्या क्षेत्रापुरते युद्ध सुरू असते! त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर जाणे म्हणजेच युद्ध जिंकणे असा विचार पेरला. या विचाराने पराभवाच्या मानसिकतेला कुठल्या कुठे दूर फेकून दिले आणि सार्वभौम राष्ट्राचे स्वप्न विविध क्षेत्रात काम करणाऱया भारतीयांनी यशस्वी करून दाखवले. स्वातंत्र्यपूर्व काळात हॉकीत आपले नाव राखणारे पुढे क्रिकेटपासून राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा झेपावण्याचे स्वप्न पाहू लागले. आता ती स्वप्ने वास्तवात उतरून सुवर्ण कामगिरी साधू लागली आहेत. क्रिकेटचे जगत्जेतेपद दोन वेळा खेचून आणून आपण आपल्या क्षमतांचे दर्शन घडवले आहे. आणीबाणीत शिस्तीला काहींनी महत्त्व दिले तर बहुतांशांनी स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. त्यातून मोठय़ा शक्ती विरोधात आपण एकत्रित शक्ती उभी करू शकतो असा विचार रुजवला गेला. पुढे या चुकांबद्दल नेतृत्वाला आपण माफही केले. आतंकवाद, नक्षलवाद, या विरोधात आपला लढा संघटितरित्या आजही सुरू आहे. त्याची किंमत युवा नेतृत्व गमावून मोजली आहे. प्रसंगी संसदेपासून मुंबई सारख्या शहरापर्यंतचे हल्ले सोसले आहेत आणि अतिरेक्मयांना कंठस्नानाने आपले इरादेही स्पष्ट केले आहेत. मंदिर, मशीद प्रश्नावर आपण न्यायालयात निकाल मिळवला आहे आणि सर्वसामान्यांच्या, मागासांच्या आरक्षणासाठी प्रसंगी ध्रुवीकरणाचे आणि तिथून आर्थिकदृष्टय़ा मागासाच्या आरक्षणापर्यंत आपण पोहोचलो आहोत. प्रगतीच्या अशा असंख्य वाटा यशस्वीपणे पादाक्रांत करत अवघ्या 75 वर्षात नियतीशी केलेल्या करारातील अनेक बाबी आपण यशस्वी करून दाखवल्या आहेत. भारतीय स्वतःच व्यवस्था उखडून टाकतील हे चर्चिल सारख्या द्रष्टय़ाव्यक्तीचे दर्पोक्तीयुक्त बोल आपण खोटे करून दाखवले आणि आपल्या परीने लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे कामही करून दाखवले. इथल्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने परदेशात विरोधी नेता भूमिका बजावण्याची किमया करतो तर कधी त्याच्या प्रकृतीच्या चिंतेने सत्ताधारी योगदान देतो, येथे कधी संघटित शक्ती यशस्वी होते तर कधी आघाडी करून अनेक पक्षांची युती होते. कधी प्रादेशिक नेतृत्व देशात चमकून उठते तर कधी एकमुखी नेतृत्वामागे संपूर्ण देश उभा राहतो. त्या त्या काळाला आवश्यक असा निर्णय देत इथल्या जनतेने हे स्वातंत्र्य अबाधित राखले आहे.

Related Stories

नेत्यांच्या ‘खासगी उपचारांवर’ नेटकऱयांकडून ताशेरे

Patil_p

वाघांच्या स्थलांतरणाचा प्रश्न

Amit Kulkarni

शिवसेनेची दिशा

Patil_p

उंच करा विधायकतेची गुढी!

Patil_p

भीष्ममहात्म्य

Patil_p

सोनीचा फुल प्रेम मिररलेस कॅमेरा सादर

Omkar B
error: Content is protected !!