मच्छेमध्ये बंद फ्लॅट फोडला : 5 लाखांहून अधिक दागिने, रोकड लांबविली
प्रतिनिधी /बेळगाव
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी खाते उघडले आहे. दत्त कॉलनी, नेहरुनगर, मच्छे येथे एका बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सुमारे 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने व रोकड लांबविली आहे. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
एका लष्करी जवानाच्या घरी चोरीची ही घटना घडली आहे. नेहरुनगर, मच्छे येथील नंदिनी सतीश सुतार यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. नंदिनी यांचे पती लष्करीसेवेत आहेत. त्या चार दिवसांपूर्वी आपल्या फ्लॅटला कुलूप लावून खानापूरला गेल्या होत्या. रविवारी घरी परतल्या त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याची चेन, अर्धा अर्धा तोळ्याच्या दोन चेन, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, 20 हजार रुपये रोख, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, मिक्सर, भांडी, डबे आदी साहित्य पळविले आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंबंधी रविवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता घटना घडली आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा एफआयआर करण्यास पोलीस टाळाटाळ करतात. वर्षभर अशाच गुन्ह्यांचा सपाटा लागू नये, म्हणून अशी काळजी घेतात. त्यामुळेच एफआयआर दाखल झाला नसल्याचे समजते.