तीन महिन्यातील सर्वांत मोठी वाढ
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोविड बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. काल बुधवारी एकाच दिवशी नव्याने तब्बल 42 बाधित सापडल्याने बाधितांचा एकूण आकडा थेट 149 पर्यंत पोहोचला. गेल्या तीन महिन्यातील ही सर्वांत मोठी वाढ झाली आहे. त्यातून सरकारची चिंता वाढू लागलीय. तथापि एकही बाधित इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही, हेच एक दिलासादायक चित्र आहे.
राज्यातील कोविड बाधितांचा आकडा अचानक वाढला. कोविडने पुन्हा डोके वर काढले, असे म्हणता येईल. एरव्ही गेले अनेक दिवस रोज आठ ते बारा किंवा तेरा असे नवे बाधित सापडत होते. कधी कधी हा आकडा चार ते पाचवरही होता. मात्र बुधवारी एकदम 42 बाधितांची नव्याने भर पडली. यातून कोविड पुन्हा पसरतोय हे दिसून आले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोविडचा फैलाव होतोय. सध्या प्रभाव मर्यादित असला व तीव्रता सौम्य असली तरी आता पुन्हा एकदा गांभीर्याने घेण्याची पाळी आली आहे. लोकांनी मास्क तसेच सामाजिक अंतर पाळून हालचाली करणे आवश्यक आहे.