Tarun Bharat

‘एकदा काय झालं’: कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्याची अनोखी पद्धत

जय नाईक /पणजी

‘एकदा काय झालं’ ही अशा एका व्यक्तीची कथा आहे, जो एक वेगळी शाळा चालवत असतो. कथेच्या माध्यमातून आपण जगातला कोणताही विचार, इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, मग तो विचार कितीही मोठा असू देत किंवा लहान, याचा त्याला विश्वास असतो. त्याच्या  शाळेत जेथे त्याचा मुलगाही शिकत असतो, तो सगळे विषय कथेच्या माध्यमातूनच शिकवत असतो. जेव्हा त्याच्या आयुष्यात एक अत्यंत कठीण प्रसंग येतो, आणि त्याला त्याविषयी आपल्या मुलाला सांगायचं असतं, तेव्हाही तो कथेच्या माध्यमातूनच संवाद साधण्याच्या आपल्या तत्वज्ञानाचाच वापर करतो.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅनोरमा विभागात शनिवारी दाखविण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधण्याची अनोखी पद्धत दाखविणारे कथानक आहे. सुमित राघवन यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून, मुलांना चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी कशा वेगळय़ा पद्धतीने, हळुवारपणे सांगता येतील, हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला असून यावर मुलं नेमकी कशी प्रतिक्रिया देतील, याबद्दल काहीही गृहित न धरता त्यांना गोष्टी सांगण्याचा मार्ग यातून दाखवला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळय़ात पाणी आल्याशिवाय राहात नाही. हे ओलावलेले डोळे पाहणे हीच आपल्या कार्याची पावती आहे, असे मत या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सुमित राघवन यांनी, चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा लगेचच आपण भूमिकेसाठी होकार दिला असे सांगितले. कारण, या चित्रपटाचा विषय अत्यंत सार्वत्रिक आहे. त्यामुळे कोणीही स्वतःला त्या व्यक्तिरेखांमध्ये बघू शकतो. अशा उत्तम पटकथा अभावनेच एखाद्या अभिनेत्यांच्या वाटय़ाला येतात, असे सांगून चित्रपटातील सर्व कलाकार अतिशय उत्तम असल्याने चित्रपट दर्जेदार बनला आहे. म्हणुनच त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे राघवन यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून मुलांसोबत काम करणाऱया कुलकर्णी यांना मुलांची नाडी अचूक ओळखता येते, म्हणुनच एवढा दर्जेदार चित्रपट ते देऊ शकले असे सांगून राघवन यांनी पुलकर्णी यांचे कौतूक केले.

दरम्यान, आपला हा चित्रपट इफ्फीमधे निवडला गेल्याबद्दल डॉ. कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला. लता मंगेशकर यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करतांना जो अनुभव आला तोच अनुभव येथे घेतला. दोन्ही प्रसंगी आपले मन भरून आले, असे त्यांनी सांगितलं. स्वतः संगीतकारही असलेल्या कुलकर्णी यांनी या चित्रपटाला संगीत देण्याचा आपला अनुभव यावेळी सांगितला. जेव्हा इतर लोक ते गाणं चित्रित करतात, तेव्हा त्यात तुमच्यासाठी काहीतरी विस्मयकारक असते, कधी खूप छान अनुभव येतो, तर कधी अपेक्षेपेक्षा वेगळा असतो, असे ते पुढे म्हणाले.

Related Stories

म्हापसा बसस्थानकाच्या पायाभरणी फलकाकडे काँग्रेसची निदर्शने

Amit Kulkarni

पंचायत : सूचना, सुधारणा, दुरुस्तीसाठी आतापर्यंत 913 अर्ज

Amit Kulkarni

शिरगावात मंगळवारी देवी लईराईचा लालखी उत्सव

Amit Kulkarni

साखळीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

पंतप्रधानांकडून महिलेच्या व्यथेची दखल

Amit Kulkarni

स्वातंत्र्यसेनानी शिवानंद गायतोंडे यांचे पुण्यात निधन

Omkar B