जिल्हा, शहर पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत कारवाई : वेगवेगळय़ा गुन्हय़ात जप्त केले होते अमली पदार्थ
प्रतिनिधी /बेळगाव
वेगवेगळय़ा गुन्हय़ात जप्त करण्यात आलेला दीड क्विंटलहून अधिक गांजा व इतर अमली पदार्थ रविवारी नष्ट करण्यात आले. सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प जवळील एका कारखान्यात वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली. जिल्हा व शहर पोलिसांनी अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई केली.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार, रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरुगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश माळी पाटील आदी वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत 7 लाख 78 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
न्यायालय-प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने अमली पदार्थ नष्ट
संपूर्ण जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात 43 गुन्हय़ात जप्त करण्यात आलेला 117 किलो 399 ग्रॅम गांजा दि बेलगाम ग्रीन एनव्हिरॉनमेंटल मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कारखान्यात चिमणीत घालून तो नष्ट करण्यात आला. रविवारी दुपारी 2 पासून ही प्रक्रिया सुरू होती. न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
दरम्यान बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात जप्त करण्यात आलेला 35 किलो 69 ग्रॅम गांजा हारुगोप्प येथील याच कारखान्यात नष्ट करण्यात आला. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व इतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत पोलिसांनी अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.