सोलापूर येथील गुन्हेगार, दोघे साथीदार फरार
प्रतिनिधी /बेळगाव
यरगट्टी, बेनकट्टी परिसरात झालेल्या चोरीप्रकरणी एका आंतरराज्य गुन्हेगाराला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे अन्य दोघे साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला तरुण व त्याचे साथीदार सोलापूर जिल्हय़ातील असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अलीकडेच यरगट्टी येथील एका किराणा दुकानात चोरी झाली होती. खासगी बँकेमध्येही चोरीचा प्रकार घडला होता. बेनकट्टी येथे एमएसआयएलचा बार फोडण्यात आला होता.
रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली, लक्ष्मी बिरादार व त्यांच्या सहकाऱयांनी सोलापूर जिल्हय़ातील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 48 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोने, 70 हजार रुपये किमतीची 1 किलो 10 ग्रॅम वजनाची 101 चांदीची नाणी, 2 हजार रुपये चिल्लर रक्कम जप्त करण्यात आली आहे.