बेळगावमध्ये दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार
बेळगाव : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दहा रुपयाच्या नाण्यांवर बंदी घातलेली नाही किंवा सरकारने सुद्धा हे नाणे चलनातून बाद केले नाही. तरीही बेळगावमध्ये दहा रुपयांचे नाणे घेतले जात नाही. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. हे नाणे का चालत नाही, याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही. मध्यंतरी काही संघटनांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हे नाणे चलनात स्वीकारले जावे, असे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. महाराष्ट्रात आणि अन्य परराज्यात दहा रुपयांचे नाणे सर्रास स्वीकारले जाते. परंतु फक्त बेळगावमध्येच हे नाणे का घेतले जात नाही, असा प्रश्न विजय साने यांनी केला आहे. विजय यांचा आयुर्वेदिक औषधे आणि अन्य मालाचा व्यवसाय आहे. या व्यवसायानिमित्त महाराष्ट्रभर फिरतो. तेथे दहा रुपयांचे नाणे दिल्यानंतर कोणतीही आडकाठी न घेता विक्रेते हे नाणे स्वीकारतात आणि सर्वत्र दहा रुपयांचे नाणे चलनात वापरले जाते. फक्त बेळगावमध्ये मात्र हे नाणे का चालत नाही? असा प्रश्न त्यांनी केला. बेळगावचा क्रमांक स्मार्ट सिटीमध्ये लागला आहे. मात्र व्यवहारात हा स्मार्टपणा का दिसत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. ना सरकारने ना रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांच्या नाण्यांना बंदी घातलेली नाही. मग बेळगावमध्ये हा कोणता नवा नियम आणि कायदा झाला आहे? हे नाणे का चालत नाही याचे स्पष्टीकरण कोणाकडेही नाही. प्रत्येक जणच हा प्रश्न विचारतो. पण व्यवहारात नाणे घेण्यास टाळतो हे वास्तव आहे. आता प्रशसनानेच याबाबत खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
नाणे स्वीकारणे बंधनकारक
य् ााबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी संपर्क साधता त्यांनी 10 ऊपयाच्या नाण्यावर कोणतीही बंदी नाही. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा आपण याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले होते. अन्य राज्यांत 10 रुपयाचे नाणे सहज स्वीकारले जाते. तसेच बेळगावमध्ये सुद्धा हे नाणे व्यवहारात स्वीकारायला हवे. कोणतेही भाजी विव्रेते, दुकानदार, व्यापारी व अन्य सर्व घटकांनी हे नाणे नाकारण्याचे कारण नाही असे सांगितले.
– जिल्हाधिकारी नितेश पाटील