वार्ताहर/ आदर्की
कापशी (ता.फलटण) येथील खताळ वस्तीनजिक ऊस वाहतूक करणाऱया भरधाव ट्रक्टरच्या मागील ट्रॉली (जुगाड) खाली सापडून श्रेयस महेंद्र खताळ (वय 12 वर्ष) मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची रात्री उशीरा लोणंद पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे.
या बाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कापशी येथील गावाबाहेरील खताळ वस्ती येथील महेंद्र खताळ यांचा मुलगा श्रेयस हा रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याने घरी जात असताना हिंगणगाव बाजुने ऊस वाहतून करणारा ट्रक्टर भरधाव वेगाने येत होता, त्याला पाठीमागे दोन ऊसाने भरलेले मुंगळे जोडले होते. त्याचवेळी अंधारात मागील ट्रॉलीचा अंदाज न आल्याने श्रेयसला ट्रॉलीचा धक्का लागल्याने तो मागील ट्रॉलीखाली पडला अन् ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. श्रेयस हा महेंद्र खताळ एकुलता एक मुलगा होता. तो येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. या घटनेने कापशी गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची तक्रार विकास खताळ यांनी लोणंद पोलास स्टेशनला दिली आहे. टूक्टर चालक संदिप कचरू पायधन (रा. सुपा ता.पाटोदा) यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. आर. पाडवी करित आहेत.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊस वाहतूक वाढली आहे. कापशी गावातून हिंगणगाव व सासवड रस्ता जातो पण अरुंद रस्ते असतानाही ऊसाने भरलेले ट्रक्टर गावातून भरधाव वेगाने ये-जा करतात. त्यामुळे संबंधीत कारखान्याने या ट्रक्टरचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा कापशीकरांनी घेतला आहे.