कृषीला विज्ञानाचे साहाय्य मिळाले तर चमत्कार घडू शकतो, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. मध्यप्रदेशातील रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात सध्या कृषीक्षेत्रात अभिनव संशोधन सुरु असून एकाच शेतात हजारो प्रकारची वेगवेगळी धान्ये कशी घेता येतील याची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे धान्यांची मूळ वाणे जपण्यासाठी विशेष प्रयोग केले जात आहेत.


सध्याचे युग संकरित बियाण्यांचे आहे. मात्र, शेतकऱयांचे लक्ष अधिक उत्पादन घेण्याकडे असल्याने मूळ पारंपरिक वाणे नामशेष होत आहेत. धान्यांही ही मूळ वाणे जपण्याची आवश्यकता असून ती नाहीशी झाल्यास एका मोठय़ा नैसर्गिक ठेव्याला आपण मुकणार असून या धान्यांपासून जी नवी संकरित बियाणे निर्माण केली जाऊ शकणार आहेत, तो स्रोतच नाहीसा होणार आहे. म्हणून भारतभरातील 23 हजार धान्यांची मूळ वाणे या विद्यापीठात सुरक्षित ठेवली जाणार आहेत. यासाठी एका शेतात हजारो धान्यांची पेरणी करण्याचे प्रयोग सुरु आहे.
अशा प्रकारच्या धान्य पेरणीमुळे पिकांचे कीडीपासून संरक्षणही चांगल्या प्रकारे होते. एकाच प्रकारचे धान्य मोठय़ा परिसरात घेतल्यास त्यावर कीड झपाटय़ाने पसरते. म्हणून विविध प्रकारची धान्ये एकाच वेळी घेण्याचा प्रयोग केला जात आहे तो यशस्वी झाला असून आता व्यापारी तत्वावर तो लागू केला जाणार आहे.