ब्रिटनच्या व्यक्तीने मोडला विक्रम
सुपरहीरोज काहीही करू शकतात! त्यांच्यासाठी भरभक्कम वस्तू उचलणे डाव्या हाताचा मळ असतो. परंतु कधी कुठल्या व्यक्तीला एका बोटाने 129.5 किलो वजन उचलताना पाहिले आहे का? नसेलच. ब्रिटनचे मार्शल आर्टिस्ट स्टीव केलर यांनी हे अशक्य वाटणारे काम करून दाखविले आहे.
स्टीव्ह यांनी एका बोटाने 129.5 किलोग्रॅमचा भार उचलून एक नवा विश्वविक्रम केला आहे. सोशल मीडियावर आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात ते ‘बाहुबली’प्रमाणे हे वजन उचलताना दिसून येतात.
स्टीव किलर यांनी 8 सेकंदांपर्यंत स्वतःच्या मिडिल फिंगरवर (मधले बोट) 129.5 किलो वजन उचलून ‘एका बोटाने सर्वात मोठी डेडलिफ्ट’ करण्याचा विक्रम केला असल्याची घोषणा गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्सने केली आहे.
स्टीव एक तज्ञ मार्शल आर्टिस्ट आहेत. वयाच्या 18 व्या वर्षापासून ते कराटेचा सराव करत आहेत. या 48 वर्षीय व्यक्तीकडे त्सुयोई-रयू कराटेमध्ये पाचवा डॅन ब्लॅक बेल्ट आणि ज्यूडोमध्ये पहिला डॅन ब्लॅक बेल्ट आहे.
कराटे सरावादरम्यान त्यांना स्वतःची हाडं अत्यंत मजबूत असून त्यांची वजन उचलण्याची क्षमताही असाधारण असल्याचे त्यांना जाणवले. हाताच्या मधल्या बोटाने एक मोठे वजन उचलल्यावर ते दंग झाले होते. त्यानंतर त्यांनी एका बोटाने सर्वाधिक वजन उचलण्याच्या विश्वविक्रमाची माहिती घेतली. या विक्रमापासून आपण केवळ 50 किलोंनी मागे असल्याचे समजल्यावर त्यांनी यासंबंधी सराव सुरू केला. त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये बेनिक इस्रायलियनकडून नोंदविण्यात आलेल्या 121.7 किलो वजनाचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य ठेवले आणि स्वतःच्या बोटातील शक्ती वाढविण्यास सुरुवात केली. याकरता त्यांनी प्रचंड सराव केला होता.