Tarun Bharat

चिंतेने मनाला पोखरणे थांबवायला हवे…

मॅडम, अलीकडे सायलीचे काहीतरी बिनसले आहे. वेगळीच वागते. धड कशातच लक्ष नाही तिचे. मधेच अस्वस्थ असते. तर कधी खूप चिडचिड करते. खरंतर ती अशी नव्हती हो. काहीतरी बदल झालाय नक्की. परवा अचानक दुपारीच ऑफिसमधून आली. तिची मुलगी रिया, खेळायला शेजारी गेली होती. ती घरी नाही हे पाहिल्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि तिकडे का गेली, पाठवलेच कुणी असे अनेक प्रश्न विचारले मला तिने. मीही वैतागले. जरा वादावादी झाली. रिया घरी आल्यावर सायली तिला मिठी मारून रडायलाच लागली. सारं शांत झाल्यावर विचारलंही की ऑफिसमधे काही प्रॉब्लेम आहे का? कामाचे प्रेशर आहे का? तर ‘नाही’ हे एकच उत्तर. पण काहीतरी चुकतंय मॅडम. हल्ली नवीन काय फॅड तर रियाला हॉलमधेसुद्धा एकटीला बसू देत नाही. जरा पोरीने पंखा लावला आणि खुर्ची घेऊन बसली तर लगबगीने ही धावणार आणि म्हणणार..रियू इथे नको, तिथे बस. असे अनेक बाबतीत होते. मग रियाही वैतागते, ‘आजी सांग ना गं आईला’ असं म्हणत माझ्याजवळ भुणभुण..

बरं, साधारणपणे किती दिवस सुरू आहे हे?

‘गेला महिनाभर हे असंच सुरू आहे. तुम्ही रियाच्या बाबांजवळ बोललात का याविषयी? हो, चार दिवसांपूर्वीच बोलले. तोही खूप बिझी असतो. रोज धावपळ, कामाचा ताण यामधे त्याला मनस्ताप नको म्हणून इतके दिवस बोलले नव्हते.

त्यांनाही सायलीमधे बदल जाणवतो. काहीवेळा आपल्यातच हरवल्यासारखी असते, कधी लक्षच नसतं..पूर्वीसारख्या गप्पा मारत नाही. पण त्यांनाही वाटलं कामाच्या दगदगीने असं होत असेल. त्यांनी बाकी काही चर्चा न करता दोन दिवस बदल म्हणून त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर जायचे ठरवले. ही सुरुवातीला हो म्हणाली पण नंतर नको ते फार्म हाऊस म्हणत काही कारण न सांगता बेत कॅन्सलच केला. एरवी हौसेनं बाहेर पडणारी ही मुलगी. हिला काय झालं असेल हा प्रश्न त्यांनाही पडलाच आहे. त्यांनीही बोलायचा प्रयत्न केला तिच्याजवळ! परंतु, ती काही नाही म्हणून विषयच बदलते. काय करावे कळत नाही. काहीतरी मनात आहे तिच्या. ती बोलत नाही.

हो..तिच्याजवळ बोलावं लागेल. ती येईल का?

हो. मॅडम. मी तिला काल समोर बसवून शांतपणे समजावून सांगितले की हे जर असेच सुरू राहिले तर सगळा आनंद हरवून बसशील. आमच्याजवळ बोलता येत नसेल तर आपण दुसऱया कुणाचीतरी मदत घेऊ. ती यायला तयार आहे. नंतर ठरल्यावेळेनुसार मीनाक्षीताई सायलीला घेऊन आल्या. तिच्याजवळ संवाद साधल्यानंतर बऱयाच गोष्टी उलगडत गेल्या.

सायलीच्या ऑफिसमधे एक महिला होती. ती आवड म्हणून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत होती. ऑफिसमधल्या काही लोकांनी तिला उत्सुकतेने आपापल्या पत्रिका दिल्या होत्या. काही जणांना तिने सांगितलेले अगदी पटले तर काही जणांच्या बाबतीत त्या गोष्टींचा दुरान्वयेही संबंध नव्हता. सहकाऱयांच्या आग्रहाने सायलीने आपल्या लेकीची पत्रिका तिला दाखवली. पत्रिकेवर नजर फिरवत बाकी सगळं छान आहे परंतु पंचवीसाव्या वषी हिला खूप जपायला हवे.

असं त्या म्हणाल्या. बस्स, त्यानंतर मैत्रिणींमधे गंडांतर वगैरे विषयांची चर्चा सुरू झाली. सायलीने अनेक उदाहरणे ऐकली आणि ते सगळं हिच्या मनामध्ये एवढं बसलं की रियाला पाहिलं की तिला धस्स व्हायचं. खरंच हिला काही झालं तर?

तिचं मन तिला बजावयाचं. अगं सायली, शिकलेली ना तू, काय आणि कसला विचार करतेस? मग तिला वाटायचे या क्षेत्रातील कुणा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा का? पुन्हा विचार यायचा. नको. परत त्यांनी तेच सांगितले तर? अजूनच अवघड. नवऱयाचा या कुठच्याच गोष्टींवर किंचितही भरवसा नव्हता त्यामुळे त्याच्याजवळ कसं बोलणार..म्हणून ती शांत राहिली. परंतु महिनाभर आतल्या आत तिचा स्वतःसोबतच झगडा सुरू होता. हळूहळू स्वप्नं पडू लागली. जीव घाबरू लागला. सायलीला चिंता ग्रासू लागली होती. काहीवेळा ती प्रयत्नपूर्वक हे विचार बाजूला सारायची परंतु समोर रिया दिसली की पुन्हा चक्र सुरू व्हायचे. ती पंख्याखाली बसली तर पंखा तर पडणार नाही ना हा विचार तिला त्रस्त करायचा. मैत्रिणींनी सांगितलेले विविध किस्से मनात घर करून राहिले होते आणि ‘गंडांतर’ या एका शब्दाने तिची अलीकडे झोपही उडवली होती.

सायलीला काही गोष्टी वेगळय़ा पद्धतीने समजावून सांगून मनात येणारा विचार हा केवळ विचार आहे याचे भान आणणे आवश्यक होते. समुपदेशन आणि विविध तंत्राचा सराव याच्या सहाय्याने सायली या चिंतेतून बाहेर पडलीही.

परंतु सायलीला असं काय झालं होतं? तर तिची भवितव्यातील सुरक्षितता नाहीशी झाली होती. सायली ऑफिसमधून आली आणि रिया दिसली नाही की तिला वाटायचं, कुठे गेली ही? घराबाहेर पडायची काही गरज आहे का? काही झाले तर? ती कुठे पडली तर? अपघात झाला तर, या आणि अशासारख्या वेगवेगळय़ा विचारांची काल्पनिक भुतं तिला त्रास देत होती.

खरंतर चिंता हा माणसाच्या आयुष्यातील एक तसा अविभाज्य आणि स्वाभाविक घटक आहे. स्वाभाविक चिंता सावधानतेचा इशारा देते. जबाबदारीची जाणीव करून देते. मात्र वास्तविक चिंता ज्यावेळी विकृत चिंतेकडे वळते त्यावेळी असा गोंधळ होतो. पहा हं..वरच्या उदाहरणातील सायलीला तिच्या विश्वासानुसार मुलीवर गंडांतर येणार म्हटल्यावर काळजी वाटली, स्वाभाविक आहे. परंतु समजा वयाच्या पंचवीसाव्या वषी हे गंडांतर येऊ शकेल असे मानले तरी मुलीला जराही नजरेआड न करणे, ती दिसत नाही म्हटल्यावर जीव घाबराघुबरा होणे, अस्वस्थ वाटणे याचे कारण पाहिले तर आईला मुलीची वाटणारी स्वाभाविक चिंता इथे विकृत झाली होती.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, भीती आणि चिंता यामधे एक महत्त्वाचा फरक आहे. समजा मी रस्त्याने चालत जात आहे. अचानक कुत्रा अंगावर धावून आला. एकदम छातीत धस्स होईल. अगदी तोंड कोरडंही पडेल. इथे निर्माण झाली ती भीती. संकट प्रत्यक्ष समोर उभं राहतं तेव्हा आपल्याला वाटते ती भीती. परंतु चिंतेमधे आपल्यावर काहीतरी संकट कोसळेल असं उगीचच वाटत राहतं.

भीती ही प्रत्यक्ष संकटावरील प्रतिक्रिया असते, तर चिंता ही संकटाची अपेक्षा असते असं म्हटल्यास ते वावगे ठरू नये. म्हणजे पहा, उद्या कसे व्हायचे हा विचार आपल्याला काम करायला, नियोजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. पण त्याचे रूपांतर जर चिंतेत झाले तर मात्र तो इतका त्रासदायक ठरतो की आजचे कामही हातून नीट होत नाही. प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो, अस्वस्थता येते. उद्याविषयक अंदाज बांधणे करायला हवे हे खरे परंतु भविष्याची निरर्थक चिंता करून मनाला पोखरणे हे आपले आपणच थांबवायला हवे. स्वतःच्या मनात डोकावत, विचार भावना न्याहाळत अविवेकी प्रतिक्रिया देण्यापेक्षा विवेकी प्रतिसादाकडे आपल्याला कसे जाता येईल या दृष्टीने प्रयत्न केले तर विकृत चिंतेपासून आपण स्वतःला बाजूला ठेवू शकू हे मात्र खरे!!

-ऍड. सुमेधा संजीव देसाई

Related Stories

प्रशासक नियुक्तीतून भाजपला शह

Patil_p

निजात्मसुख आणि सन्मार्ग

Patil_p

कोरोनावर मात करण्यासाठी हवी देशभावना!

Patil_p

क्षमा करणें तुम्हांसि उचित

Patil_p

सौर कुंपणाचा पर्याय !

Patil_p

कठीण शब्दें वाईट वाटतें !हें तों प्रत्ययास येतें !

Patil_p