दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
सीटबेल्ट परिधान न करणाऱया कारचालकांना आता हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी मंगळवारी यासंबंधी आदेश जारी केला आहे.
बेळगावसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांना या आदेशाची प्रत पाठवून देण्यात आली आहे. सीटबेल्ट परिधान न करता कार चालविणाऱयांना यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता. आता दंडाची ही रक्कम एक हजार रुपये करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 19 सप्टेंबर रोजी राज्य सरकारला पत्र पाठविले होते. वाढते अपघात आणि त्यात बळी जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी यापुढे राज्यात सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. बरेच वाहनचालक सीटबेल्टचा वापर न करता वाहन चालवत असतात म्हणून दंडाची रक्कमही एक हजार रुपये करण्यात आली आहे.