संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर वार्ताहर
वीजबिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा व्हॉट्सअप मेसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या लिंकवर अकाऊंटची माहिती दिल्याने तालुक्यातील कडवईमधील डॉक्टरांची 24 हजार 799 हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. मयुरेश विलास पुरोहित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर वीजबिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा मेसेज आला. हा मेसेज तिने पती मयुरेश यांना फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने वीजबिल अपडेट करण्यासाठी लिंक पाठवत आहे, असे सांगत 10 रुपये भरण्यास सांगितले. मयुरेश याने लिंकद्वारे 10 रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या खात्यामधून 10 हजार, 9 हजार 999 व नंतर 4800 रुपये डेबिट झाल्याचे 3 मेसेज आले आणि अकाऊंटमधून 24 हजार 799 डेबिट होऊन ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखा, कडवईमध्ये जाऊन आपले अकाऊंट लगेच बंद केले. या बाबतची खबर त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.