राजकीय नेतेमंडळींच्या सहभागाची जोरदार चर्चा
हिसार / वृत्तसंस्था
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमने आपल्या पॅरोल कालावधीमध्ये ऑनलाईन सत्संग सुरू केला आहे. या सत्संगामध्ये आता भाजपचे माजी केंद्रीय मंत्रीही पोहोचल्याची चर्चा सुरू आहे. राजस्थानमधील हनुमानगड जंक्शन येथील डेरा भक्तांनी सत्संगादरम्यान ही माहिती पुढे आली. मात्र, यावेळी माजी केंद्रीय मंत्र्याचे नाव घेण्यात आले नाही. तसेच कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नसल्यामुळे संबंधिताची ओळख उघड झालेली नाही. अलीकडेच सत्संगामध्ये हरियाणाचे उपसभापती आणि नलवाचे आमदार रणबीर गंगवा हेही पोहोचले होते.
हिसारचे महापौर गौतम सरदाना यांच्या पत्नी आणि करनालच्या महापौर रेणू बाला यांनीही उपस्थिती दर्शवल्यानंतर हरियाणा भाजपमध्ये खळबळ उडाली. राम रहीमच्या सत्संगाला हरियाणातील भाजप नेत्यांनी हजेरी लावल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. त्याचवेळी राम रहीमने पंजाबमधील सुनममध्ये नवीन डेरा बांधण्याची परवानगी मिळविली आहे. शीख समाज आधीच राम रहीमवर नाराज असल्याने या निर्णयामुळे पंजाबमध्ये गोंधळ सुरू होऊ शकतो. आत्तापर्यंत पंजाबमधील भटिंडा येथील सलाबतपुरा येथे दुसरा सर्वात मोठा डेरा आहे. हे ठिकाण हरियाणाच्या सिरसा मुख्यालयानंतर दुसऱया क्रमांकावर आहे.