Tarun Bharat

97 विद्यार्थ्यांमागे केवळ 3 शिक्षक

धावशिरे तिस्क उसगाव शाळेवर पुन्हा अन्याय : संतप्त पालकांकडून बहिष्कार, मोर्चाचा इशारा

वार्ताहर / उसगांव

Advertisements

धावशिरे तिस्क उसगांव येथील सरकारी प्राथमिक शाळेत अपुऱया शिक्षकांमुळे पालकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. येत्या दहा दिवसात अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती न केल्यास विद्यार्थ्यांकडून वर्गावर बहिष्कार टाकण्यात येईल. तसेच फोंडा  भागशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण 97 विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. पटसंख्या जास्त असूनही चार वर्गांसाठी केवळ तीन शिक्षिका विद्यादान करीत आहेत. या ठिकाणी एका शिक्षिकेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार आहे.

चार वर्गासाठी तीन शिक्षक

प्राथमिक शिक्षणाची बैठक पक्की झाल्यास मुलांचे पुढील शिक्षण चांगले होते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर मुलांना चांगले शिक्षण व आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र धावशिरे शाळेची स्थिती पाहिल्यास सरकारची शिक्षणाबाबत चाललेली अनास्था दिसून येते. मराठी माध्यमातून जवळपास 100 विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळेत चार वर्गांसाठी तीन शिक्षक हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. यापूर्वी या शाळेत चार शिक्षिका होत्या. मार्च महिन्यात फोंडा भागशिक्षणाधिकाऱयांनी एका शिक्षिकेची बदली सातेरीभाट वळवई येथे केली. पंधरा दिवसांसाठी या शिक्षिकेला दुसऱया शाळेत पाठवित असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पालकांनीही त्याला हरकत घेतली नाही. मात्र पंधरा दिवस होऊनही शिक्षिका पुन्हा या शाळेत न आल्याने पालकांनी भागशिक्षणाधिकाऱयांची भेट घेऊन विचारणा केली. धावशिरे शाळा दुपारी भरत असल्याने याठिकाणी कुठलाच शिक्षक येण्यास तयार नाही, असे उत्तर भागशिक्षणाधिकाऱयांकडून पालकांना ऐकायला मिळाले. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर  तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. 6 जून रोजी एका शिक्षिकेला नियुक्तीची ऑर्डर काढण्यात आली. पण या शिक्षिकेने धावशिरे शाळेत रुजू होण्यास नकार दिला. 14 जून रोजी परत एकदा पालकांनी भागशिक्षणाधिकाऱयांचे कार्यालय गाठले. पण पुन्हा आश्वासन देऊनच पालकांची बोळवण करण्यात आली.

खात्याच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

धावशिरे येथे शाळेचे वर्ग दुपारच्या सत्रात भरविले जातात. त्यामुळे याठिकाणी विद्यादानाचे कार्य करण्यात शिक्षका उत्सुक नसतात. वास्तविक खात्याने आदेश दिल्यानंतर त्याठिकाणी रुजू होणे त्या शिक्षकाचे प्रथम कर्तव्य असते. आपल्या ओळखीचा मंत्री किंवा आमदारांकरवी दबाव आणून बदलीचा आदेश रद्द केला जातो. त्याच थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची पालकांची मागणी

शाळा दुपारच्या सत्रात भरत असल्याने शिक्षक व पालकांचेही हाल होतात. त्यामुळे पालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर समस्या घातली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी तोडगा काढण्याची हमी दिली होती. येथील एका प्रशस्त जागेची पाहणी करुन शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा विचार होता. पण घर मालकाला भाडय़ाचे पैसे देण्याची शिक्षण खात्याकडून  तजवीज न केल्याने ही पर्यायी व्यवस्था अडकली.

तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल

सन 2019 साली या शाळेत अशीच समस्या उद्भवली होती. 103 विद्यार्थी असलेल्या पहिली ते चौथीच्या चार वर्गात केवळ दोन शिक्षका शिकवत होत्या. फोंडा भागशिक्षणाधिकारी कार्यालय तसेच शिक्षण संचालकांना विनवणी पत्रे, स्मरणपत्रे पाठवूनही आणखी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यास टाळाटाळ केल्याने अखेरचा मार्ग म्हणून पालकांनी मराठीप्रेमी व प्रसार माध्यमांकडे मदतीची हाक दिली. विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला. पालकांनी फोंडा येथील भागशिक्षणाधिकाऱयांच्या कार्यालयावर मोर्चा नेला व दोन शिक्षकांची नियुक्तीपत्रे मिळाल्यानंतरच मोर्चा माघारी घेतला.

या इतिहासाची पुनरावृत्ती होण्यास पालकांना प्रवृत्त न करता अतिरिक्त शिक्षिका नेमणूक करावी. त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Related Stories

ऑनलाईन क्लाससंबंधीही सावधगिरी बाळगा

Omkar B

अतिवाड शिवारात वीजखांब-वाहिन्या धोकादायक

Omkar B

महामार्गावर बंदोबस्त,वाहनांची तपासणी

Omkar B

कंत्राटदाराचा गलथान कारभार चव्हाटय़ावर

Patil_p

आधारकार्ड मोबाईल लिंकसाठी सर्वसामान्यांची लूट

Amit Kulkarni

भातकांडे स्कूलच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Patil_p
error: Content is protected !!