आलिशान घरांची किंमत जाणून व्हाल दंग
नायजेरियातील एका ठिकाणाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही चकित व्हाल. नायजेरियात एक अनोखे बेट असून त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या बेटाचे नाव ‘बनाना’ आहे. नायजेरियातील हे बेट एका आलिशान महालाप्रमाणे आहे. या बेटावर राहणारे सर्व व्यक्ती अब्जाधीश असून ते तेथे आलिशान जीवन जगत असतात.
अनेक अब्जाधीशांनी मिळून नायजेरियात हे कृत्रिम बेट तयार करविले आहे. या बेटावर एकाहून एक सरस इमारती आहेत. नायजेरियाच्या आगोसमध्ये निर्मित या बेटाचा केळय़ासारखा आकार असल्यानेच याला बनाना आयलँड हे नाव देण्यात आले आहे. या बेटावर एक सर्वसामान्य माणूस घर खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाही.
पॅरिस, न्यूयॉर्क आणि टोकिया यासारख्या शहरांशी स्पर्धा करण्यासाठी अब्जाधीशांनी नायजेरियात एक कृत्रिम बेट तयार केले आहे. या बेटावर चहुबाजूला झगमगाट दिसून येतो. या विशेष बेटावर केवळ अब्जाधीशच राहतात.
कोटय़वधींमध्ये एका घराची किंमत
बनाना आयलँड नावाने प्रसिद्ध या बेटावर जमीन आणि घरांच्या किमती कोटय़वधींमध्ये आहे. 2003 मध्ये हे बेट तयार झाले हेते. या बेटाचा आकार 402 एकर इतका आहे. येथे एका चौरस मीटर भूखंडाची किंमत 84 हजार रुपये इतकी आहे. याचबरोबर येथे एक डिटॅच्ड घर खरेदी करण्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करावे लागतात. येथील सर्वात महागडे घर 100 कोटी रुपयांचे असून ते 2600 चौरस मीटर आकाराचे आहे आणि यात 6 बेडरुम्स आहेत.
निमंत्रण असेल तरच प्रवेश
या बेटावर राहणाऱया लोकांना शांततेचा अनुभव प्राप्त होतो. नायजेरियाच्या लागोस या गर्दीयुक्त शहरापासून दूर आणि शांत वातावरणात राहू इच्छिणारे श्रीमंत लोक येथे घर खरेदी करतात. बेटावर सुरक्षेसह प्रायव्हसी देखील त्यांना मिळत आहे. या बेटावर घरांसह दुकाने आणि शोरुम देखील अत्यंत महागडी असून ती केवळ अब्जाधीशांनाच परवडणारी आहेत. येथे कुणालाही केवळ निमंत्रण असेल तरच प्रवेश मिळतो. यामुळे येथे वाहतूक अत्यंत कमी असते.