प्रतिनिधी /मडगाव
गोवा डेअरी नेहमीच विविध विषयांवरून चर्चेत असते. कधी नोकर भरती तर कधी दुधाचा दर वाढविल्याने तर कधी दूध पशु खाद्यावरून. मात्र, यावेळी गोवा डेअरी निवडणुकीच्या मुद्यावरून चर्चेत आली आहे. गोवा डेअरीला दूध पुरवठा न करणाऱया व्यक्तीच गोवा डेअरीच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती हाती आली आहे. गोवा डेअरीच्या निवडणुकीसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून त्यात अर्ज ग्राहय़ धरले जातात की, फेटाळले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक 19 जून रोजी होणार असून त्यासाठी काल सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज मंगळवार दि. 31 रोजी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. गोवा डेअरीची निवडणूक यावेळी बरीच प्रतिष्ठेची बनण्याची शक्यता आहे. गोवा डेअरीच्या काही माजी वादग्रस्त संचालकांनी पॅनल करून ही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्यासाठी ज्या अटी व नियम आहेत. त्या नियमाच्या चौकटीत न बसणाऱया व्यक्तीच निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. गोवा डेअरीवर ताबा ठेवण्यासाठी काही राजकीय व्यक्ती ही छुप्या पद्धतीने कार्यरत झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होऊ लागलाय.
संचालक मंडळावर एकूण 12 जणांची निवड केली जाणार आहे. ही निवड पाच वर्षासाठी असून नवीन संचालक मंडळाचा कार्यकाळ 2022 ते 2027 पर्यंत असेल. दरम्यान, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या मध्ये काही जणांचा गुरांचा धंदा किंवा व्यवसाय नाही. ते गोवा डेअरीला धड 1 लीटर दूध पुरवठा करीत नाही. ते निवडणुकीत कसा काय भाग घेऊ शकतात असा सवाल उपस्थित झालेला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांची बरीच धडपड सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कुणाकडून तरी एक लीटर दूध घ्यायचे व ते आपल्या सोसायटीत पुरवायचे व आपण दूध पुरवठा करतो असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न देखील झाल्याची माहिती हाती आली आहे.
या पूर्वी वादग्रस्त ठरलेले संचालकच पुन्हा एकदा निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुळात वादग्रस्त असलेल्यांना निवडणूक लढविण्याची संधी देणे हा अत्यंत चुकीचा पायंडा ठरू शकतो अशा प्रतिक्रीया देखील व्यक्त होत आहे.
गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱया ज्या सोसायटीचे अध्यक्ष निवडणूक लढविणार आहेत. त्या सोसायटीने गोवा डेअरीला 270 दिवस दूध पुरवठा करणे आवश्यक आहे. जर 270 दिवस दूध पुरवठा केला नाही तर त्या सोसायटीचे अध्यक्ष निवडणूक लढविण्यास पात्र ठरू शकत नाही असा नियम आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 270 दिवस दूध पुरवठा न करणाऱया सोसायटीच्या अध्यक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्याचे अर्ज आज ग्राहय़ धरले जाणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.