वृत्तसंस्था/ चंदीगड
भाजपने पंजाबच्या संगरूग लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी केवल सिंह ढिल्लों यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संगरूर मतदारसंघात 23 जून रोजी मतदान होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर भगवंत मान यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. चालू वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मान यांनी धूरी मतदारसंघात विजय मिळविला होता.
मान यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता. पंजाबमधील सत्तारुढ आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीसाठी गुरमेल सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसने माजी आमदार दलवीर सिंह गोल्डी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बलवंत सिंह राजोआणाची बहिण कुलदीप कौरला शिरोमणी अकाली दलाने उमेदवारी दिली आहे. भाजपचे उमेदवार ढिल्लों हे बरनालाचे माजी आमदार आहेत. ढिल्लो यांनी शनिवारी अन्य काही काँग्रेस नेत्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.