कुकडोळी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कुकडोळी गावातील शिवारामध्ये काही जणांनी रस्ता अडविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाणे कठीण झाले आहे. तेव्हा तो रस्ता सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी कुकडोळी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुकडोळी गावातील सर्व्हे क्रमांक 16 ते 19 दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. जवळपास 35 हून अधिक एकर जमीन आहे. मात्र त्या जमिनीला जाण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नाही. एकच रस्ता होता. तो रस्ताही आता बंद करण्यात आला आहे. आम्ही येथून रस्ता सोडणार नाही, असे सांगून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. तेव्हा तो रस्ता सर्वांसाठी खुला करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बसवंत झुंझण्णावर, मंजुनाथ झुंझण्णावर, सदानंद झुंझण्णावर, यल्लाप्पा झुंझण्णावर, मडिवाळी हंपण्णावर, मारुती बडगेर, सिद्धराम बडगेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.