अमेरिकेच्या एनएसएसोबत डोवाल यांची बैठक ः गेमचेंजर तंत्रज्ञानांच्या हस्तांतरणावर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अमेरिकेसोबत नव्या पुढाकाराची सुरुवात करण्यासाठी वॉशिंग्टनच्या दौऱयावर जाणार आहेत. 31 जानेवारी रोजी डोवाल यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सुलिवन यांच्यासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (आयसीईटी) प्रेमवर्कची पहिली चर्चा होणार आहे. या पुढाकारावर सहमतीची घोषणा मागील वर्षी जपानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यातील चर्चेनंतर झाली होती.
भारतासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याच्या माध्यमातून भारतासाठी 10 अत्यंत संवेदनशील आणि गेमचेंजर टेक्नॉलॉजीचे दरवाजे खुले होणार आहेत. ही तंत्रज्ञानं सामरिक दृष्टीकोनातून सर्वप्रकारे बेजोड आहेत.
दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांदरम्यान थेट चर्चा होण्यातून तंत्रज्ञान हस्तांतरण प्रकरणी लालफीतशाहीचे अनेक अडथळे दूर करण्यात आल्याचा स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर ताळमेळ मजबूत होईल आणि कमी कालावधीत एक दीर्घ प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या मुद्दय़ांवर चर्चा
-अंतराळाच्या कक्षेत सर्व्हिसिंग, असेंबली आणि मॅन्युफॅक्चरिंग कसे करावे
-अंतराळ यानाचा आर्थिक वापर कसा करावा
-कमी खर्चात अंतराळयान कशाप्रकारे प्रक्षेपित करावे
-लोकल आणि वाइड फील्ड इमेजिंगसाठी सेंसर कसे विकसित करावेत.
-स्पेस प्रोपेल्शन कशाप्रकारे तयार व्हावे
-क्रायोजेनिक इंधन द्रव्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे व्हावे
-अंतराळ यान वापसीची आव्हाने अन् लँडिंगच्या पद्धती
गेमचेंजर तंत्रज्ञान
गेमचेंजर तंत्रज्ञानामध्ये ऍडव्हान्स्ड इंजिनियरिंग मटेरियल्स, गॅस टर्बाइन इंजिन टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग, नेटवर्क सेंसिंग अँड सिग्नेचर मॅनेजमेंट, आण्विक ऊर्जा तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, ऑटोनॉमस सिस्टीम्स अँड रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजीस आणि कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग टेक्नॉलॉजी सामील आहे. याचबरोबर डायरेक्टेड एनर्जी म्हणजेच लेझर वेपन्स, फायनान्शियल टेक्नॉलॉजी, ह्यूमन मशीन इंटरफेस, हायपरसोनिक्स टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, स्पेस टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम्स आणि सेमी कंडक्टर आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सवरही चर्चा होणार आहे.
अंतराळक्षेत्रासंबंधी चर्चा शक्य
दोन्ही देशांदरम्यान अंतराळावरूनही चर्चा होणार आहे. याकरता इस्रो प्रमुख एस. सोमनाथ देखील डोवाल यांच्यासोबत अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत. अंतराळ विषयक चर्चा भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही देशांदरम्यान आदान-प्रदान होऊ शकतील अशी अनेक क्षेत्रे आहेत.